कौशल्य विकासासाठी ही रोबोटिक्स लॅब उपयुक्त : शेखर सिंह

सायन्स पार्कमध्ये अत्याधुनिक रोबोटिक्स लॅबचे उदघाटन
पिंपरी : विद्यार्थ्यांच्या नवकल्पना आणि कौशल्य विकासासाठी ही रोबोटिक्स लॅब उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

पिंपरी- चिंचवड सायन्स पार्क येथे लीडरशिप फॉर इक्विटी आणि रोबोटेक्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या अत्याधुनिक रोबोटिक्स लॅबचे उदघाटन सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी यावेळी सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खापरिया, मधुकर रेड्डी बानुरी, दामिनी माईणकर, मनीषा सावंत उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगाचा प्रत्यक्ष अनुभव देऊन त्यांची कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी रोबोटिक्स लॅब उपयुक्त ठरणार आहे. ही लॅब केवळ तंत्रज्ञान शिकवणारी नसून, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणारी, समस्या सोडवणारी आणि भविष्यातील अर्थव्यवस्थेत आत्मविश्वासाने सहभागी होण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. या प्रयोगशाळेतून विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स व प्रोग्रॅमिंगचे प्रशिक्षण मिळून नवकल्पना विकसित करणे शक्य होईल.
दामिनी माईणकर यांनी सांगितले की, ‘लीडरशिप फॉर इक्विटीने काही दिवसांपूर्वीच सायन्स पार्कमध्ये कम्प्युटर सायन्स कोडिंग लॅब स्थापन केली असून, या माध्यमातून आसपासच्या शाळांतील विद्यार्थी ब्लॉक-कोडिंग शिकून विविध प्रकल्प व अॅनिमेशन तयार करत आहेत. आता रोबोटेक्स इंडियाच्या सहकार्याने सुरू झालेल्या रोबोटिक्स लॅबमुळे विद्यार्थ्यांना आणखी संधी उपलब्ध होणार आहेत. या लॅबच्या मदतीने विद्यार्थी रोबोटिक्स व प्रोग्रॅमिंग अधिक सखोलपणे शिकून नवकल्पनांना मूर्त रूप देऊ शकतील व आपला दृष्टिकोन अधिक व्यापक करू शकतील.’