बहुचर्चित `इमर्जन्सी`चा ट्रेलर प्रदर्शित

प्रोस्थेटिक मेकअपद्वारे कंगना रणौतचा इंदिरा गांधी लुक गाजला
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा राजकीय मुद्दा असलेल्या विषयावरील बहुचर्चित इमर्जन्सी या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनी या चित्रपटाशी संबंधित खास झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. सोशल मीडियावर ती पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
अभिनेत्री कंगना रणोत हिने प्रोस्थेटिक मेकअपच्या सहाय्याने दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये या प्रोस्थेटिक मेकअपचे टप्पे दाखविले आहेत. अभिनेत्री कंगना कशा प्रकारे या मेकअपच्या मदतीने इंदिरा गांधी यांच्या सारखी दिसू लागते, हे या व्हिडिओमध्ये दाखविले आहे. या पद्धतीचा मेकअप करताना तो दोन, तीन वेगवेगळ्या पद्धतीने चाचणी घेऊन ठरवला जातो आणि मग अंतिम निर्णय घेऊन फायनल मेकअपचा लुक दिला जातो. इंदिरा गांधी यांचा लुक येण्यासाठी कंगनाच्या डोक्यावर विग घालण्यात आला आहे.
‘इमर्जन्सी’ चित्रपटाची तारीख जाहीर झाल्यानंतरही हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकला होता. त्यामुळे, चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार, होणार की नाही याची चर्चा बॉलीवूडसह राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. अभिनेता श्रेयस तळपदे, महिला चौधरी, मिलिंद सोमण आणि सतीश कौशिक यांच्यासारखे दिग्गज कलाकार यामध्ये झळकणार आहेत.