श्री मंगलमूर्तींच्या माघी रथयात्रेचे मोरगावकडे प्रस्थान

चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज प्राप्त श्रीमंगलमूर्तींच्या माघी रथयात्रेस प्रारंभ
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज प्राप्त श्रीमंगलमूर्तीची पारंपरिक माघी रथयात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात प्रारंभ झाली. श्री मोरया गोसावी महाराजांनी सुमारे ५२६ वर्षांपूर्वी सुरू केलेली ही यात्रा अखंडपणे सुरू असून, यंदाही मोठ्या भक्तसमुदायाच्या उपस्थितीत तिचे आयोजन करण्यात आले आहे.पालखी ८ फेब्रुवारीला चिंचवड येथे परतणार आहे.
चिंचवड येथील गाणपत्य संप्रदायातील महान संत श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज यांना सन १४८९ मध्ये मोरगावच्या पवित्र श्री गणेश कुंडातून प्राप्त झालेले श्री मंगलमूर्ती माघ महिन्यात मोरगाव येथे नेण्याची परंपरा सुरू केली. ही परंपरा गेल्या ५२६ वर्षांहून अधिक काळ अविरतपणे सुरू आहे.
यावर्षीही, चिंचवड येथील श्री मंगलमुर्ती वाडा येथून माघी रथयात्रेस भव्य सुरुवात झाली. यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त श्री जितेंद्र देव व श्री केशव विद्वांस तसेच उपस्थित होते. या सोहळ्यात हजारो भक्तांनी सहभागी होत श्री मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्तीचे दर्शन घेतले.
पालखीचा मार्ग आणि पुढील मुक्काम:
- शुक्रवार, ता. ३१: सासवड – जेजुरी – मोरगाव (पालखी आगमन रात्री ९ वा.)
- शनिवार, ता. १ व रविवार, ता. २: श्री गणेश जयंतीनिमित्त पालखी मुक्काम मोरगाव येथे
- सोमवार, ता. ३: मोरगाव – जेजुरी (मुक्काम जेजुरी)
- मंगळवार, ता. ४: जेजुरी – सासवड – कऱ्हाबाई मंदिर (मुक्काम)
- बुधवार, ता. ५: सासवड – थेऊर (श्री चिंतामणी मंदिर)
- गुरुवार, ता. ६: थेऊर – सिद्धटेक (श्री सिद्धिविनायक मंदिर)
- शनिवार, ता. ७: सिद्धटेक – पुणे (एकनाथ मंगल कार्यालय मुक्काम)
- रविवार, ता. ८: पुणे – चिंचवड (महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर, चिंचवड)
८ फेब्रुवारी रोजी पारंपरिक धुपारतीने यात्रेचा समारोप होईल.
भक्तांसाठी आवाहन
चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व भक्तगणांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भक्तिमय आणि ऐतिहासिक पालखी सोहळ्यात सहभागी होऊन श्री मोरया गोसावी महाराज प्राप्त मंगलमूर्तीचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी लाभावी, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी केले आहे.