गाथा हे तुकोबारायांचे ऐश्वर्य धन!

रामभाऊजी महाराज राऊत यांचे भंडारा डोंगर येथे कीर्तन सप्ताहात प्रतिपादन
पिंपरी : मानवाने आपल्या हितासाठी तुकोबारायांनी गाथेत केलेल्या उपदेशाप्रमाणे वागून आपले कल्याण करून घ्यावे. कारण, गाथा हेच तुकोबारायांचे धन होते, असे हरिभक्त परायण रामभाऊजी राऊत यांनी सांगितले.
संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त आयोजित गाथा पारायण आणि कीर्तन सप्ताहात ते बोलत होते. श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे हा सप्ताह सुरू आहे. सोमवारी (ता. १७) काल्याच्या कीर्तनाने याचा समारोप होणार आहे.
चिंतनासाठी महाराजांनी हितावरी यावें । कोणी बोलिलों या भावें ॥१॥ हा अभंग चिंतनासाठी घेतला होता.
राऊत महाराज म्हणाले की, तुकोबारायांनी अभंग रचना का केली व आपणाकडून त्यांची काय अपेक्षा आहे हे अभंगात सांगितले आहे. देवाला आठवणे हा लाभ आहे आणि देवाला विसरणं ही मोठी हानी आहे. हजारो माणसांतून कोणीतरी एखादा स्वहिताकडे प्रवृत्त होईल, या भावनेने मी उपदेशाचे चार शब्द बोललो, असे तुकाराम महाराज म्हणतात.
देवाचे चिंतन करणे म्हणजे हिताकडे वाटचाल करणे होय. आमचे हे उपदेशपर बोलणे, लोकांचे रंजन करण्याकरता केलेली करमणूक नाही. आम्ही जे पाठांतर करण्याचे कष्ट घेतले, अक्षरांची आटाआटी केली, ती केवळ फक्त देवासाठी केली. तुकाराम महाराज म्हणतात की, माझ्या बोलण्याने रागावू नका व माझ्या बोलण्याची उपेक्षाही करून निजू नका तर विचाराने जागे व्हा व माझ्या उपदेशाचा विचार करा म्हणजेच देवाचे चिंतन करा. म्हणून मानवाने आपल्या हितासाठी तुकोबारायांनी गाथेत केलेल्या उपदेशाप्रमाणे वागून आपले कल्याण करून घ्यावे असे हरिभक्त परायण रामभाऊजी राऊत यांनी सांगितले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज चरित्र कथा
ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांनी संत तुकाराम महाराजांचे चरित्र कथन केले. त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या चरित्र कथेमध्ये धरणेकऱ्याचे प्रकरण सांगितले. बीड परगण्यातील एक देशपांडे ब्राह्मणाला कमी कालावधीत ज्ञान व धन हवे होते. तो पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याकडे गेला. देवाने त्याला आळंदीला माऊलींकडे पाठवले. माऊलींनी त्याला तुकोबारांकडे पाठवले.
कदम महाराज म्हणाले, तुकोबारायांनी त्याला ११ अभंग लिहून दिले व एक नारळ दिला. त्याचा त्यावर विश्वास बसला नाही. प्रारब्धात नसल्यामुळे त्याला धन व ज्ञान प्राप्त झाले नाही. मात्र हेच अभंग घेऊन दुसऱ्या एका ब्राह्मणाला ज्ञान प्राप्त झाले व नारळातील धनाद्वारे जगद्गुरु तुकोबारायांनी माउलींच्या समाधीपुढील मंडप उभारला. त्यानंतर अनगड शहाचा कधीच न भरल्या गेलेला कटोरा तुकोबारायांच्या कन्येने फक्त पिठाचा हात झटकला तर तो ओसंडून वाहू लागला.
तुकोबारायांच्या अभंगाच्या वह्या रामेश्वर भट्टानी बुडवायला लावल्या. १३ दिवस एका शिळेवर बसून तुकोबारायांनी अनुष्ठान केले. तेरा दिवसानंतर दगडा सहित वह्या तरुन वर आल्या. ज्या शिळेवर बसून अनुष्ठान केले त्या शिळेचे आता मंदिर उभारण्यात आलेले आहे. रामेश्वर भट्टांच्या अंगाचा दाह तुकोबारायांच्या एका अभंगाने शमला. नंतर रामेश्वर भट्ट तुकोबारायांना शरण गेले व त्यांच्यावर स्तुती पर अभंग लिहिले व त्यांची आरती लिहिली.