नदी स्वच्छतेचा एल्गार !

मुळा नदीपात्रात नागरिकांचा ठिय्या
पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शंभर पेक्षा अधिक पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटनांनी मुळा नदीकाठी सुरू असलेल्या नदी सुधार प्रकल्पाला विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांसह इतर राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे नदी स्वच्छतेबाबत साकडे घातल्यानंतर काहीही हाती न लागल्याने हतबल झालेल्या नागरिकांनी मुळा नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले.
पिंपळे निलख स्मशानभूमी जवळ मुळा नदीपात्रात रविवारी आंदोलन करण्यात आले. सुमारे 25 जणांनी नदीपात्रात उतरून ठिय्या आंदोलन केले. शहरातील पवना इंद्रायणी आणि मुळा नद्यांची स्वच्छता करणे आणि नदी सुधार प्रकल्प थांबविण्याच्या आग्रही मागणीसाठी हे आंदोलन मागील काही दिवसांपासून केले जात आहे. या आंदोलनाला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शंभर पेक्षा अधिक पर्यावरणप्रेमी सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
नदी सुधार प्रकल्पाचा निषेध करण्यासाठी ९ मार्च रोजी चापेकर चौक, चिंचवड येथे पहिले आंदोलन झाले. शेकडो शेकडो नागरिकांनी एकत्र येत मानवी साखळी केली. १५ मार्च रोजी बालेवाडी येथे दुसरे आंदोलन झाले. २३ मार्च रोजी पिंपळे सौदागर येथे पुन्हा मानवी साखळी करत नदी सुधार प्रकल्पाचा विरोध करण्यात आला. २९ मार्च रोजी दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याला शेकडो नागरिकांनी स्वच्छ नदीची मागणी करत वृक्षतोडीच्या विरोधात मानवी साखळी करून आंदोलन केले. 20 एप्रिल रोजी पिंपळे निलख येथे नदीपात्रात उतरून आंदोलन करण्यात आले.

मुळा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात पशुपक्षी आणि प्राण्यांचा अधिवास आहे. नदी सुधार प्रकल्पात नदीकाठच्या अनेक झाडांची कत्तल केली जात आहे. यामुळे या पशुपक्षी आणि प्राण्यांचा अधिवास संपुष्टात येणार आहे. तसेच नदीपात्र अरुंद होऊन भविष्यात पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यात नदी सुधार प्रकल्पामध्ये पाण्याच्या स्वच्छतेला दुय्यम स्थान दिले गेल्याने नागरिकांमध्ये कमालीची नाराजी आहे. त्यामुळे सातत्याने आंदोलने केली जात आहेत. पुढील आठवडाभरात हा प्रकल्प थांबवला नाही तर 27 एप्रिल (रविवारी) पुन्हा पिंपळे निलख येथे तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा पुणेकर व पिंपरीचिंचवडकरांनी दिला आहे.