आकारणी न झालेल्या मालमत्तांधारकांनी तात्काळ कागदपत्रांची पुर्तता करावी !

करसंकलन विभागाकडून आकारणी न झालेल्या मालमत्ताधारकांना आवाहन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत आकारणी न झालेल्या मालमत्तांचे नोंदणी व करआकारणी कार्यवाही करण्यासाठी मे. स्थापत्य कन्सल्टंट प्रा.लि या खासगी कंपनीची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत शहरातील मालमत्तांचे सर्वंकष सर्वेक्षण सुरू आहे. मालमत्ता सर्वेक्षणात आकारणी न झालेल्या सद्यस्थितीत २,५१,१६५ इतक्या नविन मालमत्ता आढळून आल्या आहेत. त्यापैकी २,०३,८९४ मालमत्तेची मोजणी पुर्ण झाली असून त्यावर कर आकारणी कार्यवाही सुरु आहे.
सर्वेक्षणात आढळून आलेल्या मालमत्तापैकी १,१३,८३१ या मालमत्तांचे मालमत्ताधारकांना मालमत्ताकर आकारणीसाठी कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी नोटीस, एसएमएस यामाध्यमातून कळविण्यात आले आहे. सदरची कागदपत्रे मालमत्तेस अद्यावत व बिनचूक नाव लावण्यासाठी व विशेष दिनांकापासुन आकारणी करण्यासाठी आवश्यक आहेत. अद्यापपर्यंत ज्या मालमत्ताधारकांनी कागदपत्रे सादर केलेली नाहीत अशा मालमत्ताधारकांना पुन्हा कागदपत्र मागणीपत्राची अंतिम नोटीस बजाविण्याची कार्यवाही सुरु आहे. कागदपत्रे मागणीची नोटीस समक्ष तसेच मालमत्ता बंद असल्यास मालमत्तेच्या दर्शनीभागावर लावून बजावणी करण्यात येत आहे. तरी मालमत्तेच्या नोंदणी व आकारणीसाठी आवश्यक असलेली पुढील कागदपत्रे संबंधित करसंकलन कार्यालयात पूर्तता करणे गरजेचे आहे.
१) इमारत/जमिन/फ्लॅटची मालकी हक्काची कागदपत्रे – खरेदीखत किंवा इंडेक्स २, सातबारा उतारा, मिळकतपत्रिका
२) मालमत्ता एमआयडीसी/पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण/पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ यांच्याकडील असल्यास – रजिस्टर अग्रीमेंट, दस्त व संबधित संस्थेने निर्गमित केलेले ताबा पत्राची सत्य प्रत.
३) मिळकतीबाबत नोंदणीकृत बक्षीसपत्र/वाटणीपत्र झाले असल्यास त्याची सत्य प्रत.
४) इमारत बांधकाम परवानगी प्राप्त असल्यास मंजूर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला व मंजूर नकाशाची प्रत,
या कागदपत्रांची संबंधित मालमत्ताधारकांनी पुर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे. नोटीस बजावूनही पुर्तता न केल्यास मालमत्ताधारकांस याबाबत कोणतेही स्वारस्य़ नाही असे समजण्यात येऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १५० (अ) मधील तरतूदीनुसार सहावर्षे मागे जाऊन मालमत्ताकराची आकारणी करणेशिवाय महानगरपालिकेला अन्य कोणताही पर्यायच शिल्लकच राहणार नाही. त्यामुळे ज्या मालमत्ताधारकांना मालकी हक्काचे व बांधकाम पुर्णत्वाचे कागदपत्राचे पुर्तता करण्यासाठी मे. स्थापत्य कन्सल्टंट प्रा.लि याएजन्सीमार्फत नोटीस बजाविण्यात येत असून सदर कागदपत्रांची पुर्तता करावी, असे आवाहन करसंकलन विभागाद्वारे करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील अद्यापि आकारणी न झालेल्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता करआकारणीसाठी आवश्यक कागदपत्रे सात दिवसांमध्ये विभागीय करसंकलन कार्यालयामध्ये जमा करावीत. मालमत्ताधारकांना बजाविण्यात आलेल्या नोटीसवर देण्यात आलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा नमूद केलेल्या ई-मेलद्वारेही कागदपत्रांची पूर्तता करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असून मालमत्ताधारकांनी तत्काळ संबंधित विभागाकडे कागदपत्रांची पुर्तता करावी. नोटीस बजावूनही कागदपत्रे सादर न केल्यास आणि अयोग्य आकारणी झाल्यास त्याची जबाबदारी महानगरपालिकेची राहणार नाही असा इशारा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर आकरणी व कर संकलन विभागाचे,सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिला आहे.