फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
देश विदेश

ऐन सणावारात सिलिंडर महागला

ऐन सणावारात सिलिंडर महागला

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशातील नागरिकांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मंगळवारी सकाळपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमतीत वाढ झाली आहे. इंधन कंपन्यांनी १ ऑक्टोबरपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. नव्या दरवाढीनंतर आता १९ किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरसाठी १,७४० रुपये मोजावे लागणार आहेत.

कंपन्यांनी यावेळी केवळ १९ किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत वाढवली आहे. १४ किलोग्रॅम वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये बदल केलेला नाही. कालपर्यंत या सिलिंडरची किंमत १६९१.५० रुपये इतकी होती. म्हणजेच या सिलिंडरच्या किंमतीत ४८.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

IOCL च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार १९ किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नव्या किंमती आजपासून लागू करण्यात आल्या आहेत. नवी दिल्ली व्यतिरिक्त इतर महानगरांमध्ये देखील नव्या किंमती लागू करण्यात आल्या आहेत. मुंबईत १९ किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला १,६०५ रुपये इतकी होती. गेल्या महिन्यात या सिलिंडरच्या किंमतीत ३९ रुपयांची वाढ करण्यात आली. त्यानंतर मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत १,६४४ रुपये झाली. मात्र, आज पुन्हा एकदा या सिलिंडरची किंमत वाढवण्यात आली असून आता या सिलिंडरसाठी मुंबईकरांना १६९२.५० रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईतही एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ४८.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

सलग तिसऱ्यांदा दरवाढ
घरगुती वापराच्या १९ किलोग्रॅम वजनाच्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत जुलै २०२४ पासून सातत्याने वाढवली जात आहे. एक जुलै रोजी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरची किंमत ३० रुपयांनी कमी केली होती. त्यानंतर प्रत्येक महिन्याला या सिलिंडरची किंमत वाढवण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात ८.५० रुपयांची तर सप्टेंबर महिन्यात ३९ रुपयांची वाढ करण्यात आली होती. पाठोपाठ ऑक्टोबर महिन्यात ४८.५० रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"