फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
पिंपरी-चिंचवड

मेट्रोच्या जागेबदल्यात मोबदला द्यावा

मेट्रोच्या जागेबदल्यात मोबदला द्यावा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील मोक्याच्या दहा ठिकाणच्या जागा पुणे मेट्रोसाठी ३० वर्षाच्या भाडेपट्टयाने हस्तांतरीत केल्या जाणार आहेत. महामेट्रोची स्थिरता व वित्तीय व्यवहार्यता वाढविण्याच्या दृष्टीने, तिकीटेत्तर उत्पन वाढविण्यासाठी महापालिकेने दिलेल्या जागांचा वापर वाणिज्य करण्यात येणार आहे. पालिकेने या जागा मेट्रोला मालकी हक्काने व बिनशर्त द्याव्यात, अशा सूचना राज्य सरकारने महापालिका आयुक्तांना दिल्या होत्या. मात्र, या जागा मेट्रोला देण्यासाठी योग्य मोबदला द्यावा लागेल, असे पत्र महापालिका प्रशासनाने राज्य सरकारला दिले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दापोडी ते पिंपरी या साडेसात किलोमीटर अंतरावर मेट्रो धावत आहे. दुसऱ्या टप्यातील पिंपरी ते निगडी या मार्गाचे कामकाज नुकतेच सुरू करण्यात आले आहे. यासाठीचा पहिला पिलर निगडीत उभारण्यात येणार आहे. या मार्गासाठी मेट्रोला पालिकेकडून चार हजार ८८४ चौरस मीटरच्या १५ जागांची आवश्यकता आहे. या जागा कायमस्वरूपी द्याव्यात, असा मेट्रो प्रशासनाचा आग्रह आहे.

मात्र, महापालिकेने ३० वर्षासाठी जागा दिल्याने त्याचा वाणिज्य वापर करण्यास अडचणी येत आहेत. याचाच विचार करून राज्य शासनाने आता महामेट्रोची स्थिरता व वित्तीय व्यवहार्यता वाढविण्याच्या दृष्टीने तिकिटेत्तर उत्पन्न वाढविण्यासाठी मेट्रोला वाणिज्य वापराला कायमस्वरूपी देण्याची सूचना महापालिकेला केली होती.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने मेट्रोला २०१८ मध्ये मेट्रोच्या प्रवाशांच्या पार्किंगसह इतर कामांसाठी शहरातील महत्वाच्या दहा ठिकाणच्या जागा ३० वर्षांच्या भाडेपट्टयाने दिल्या आहेत. मात्र, आता महापालिकेच्या या जागांवर मेट्रो आणि राज्य सरकारची वक्रदृष्टी पडली आहे. मेट्रो प्रकल्प वित्तीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठीचे मदत करणे आवश्यक आहे. यासाठी मेट्रोला दिलेल्या जागांचा वापर वाणिज्य विकास करून त्या माध्यमातून निधी उभारणे अत्यावश्यक असल्याचे शासनाचे म्हणणे आहे.

याबाबतचे पत्र राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या उपसचिव विद्या हम्पय्या यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना दिले होते. मात्र, महापालिकेच्या भूमी आणि जिंदगी विभागाने मेट्रोला या दहा ठिकाणच्या जागा कायमस्वरूपी विना मोबदला देता येणार नाही. जागा पाहिजे असल्यास त्याचा योग्य मोबदला द्यावा लागेल, असे पत्र पाठविल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

महापालिका कार्यालयासमोरील पार्किंग आरक्षण क्रमांक ११५, वल्लभनगर एसटी डेपो आरक्षण क्रमांक ११२, फुगेवाडी जकात नाक्याची जागा, महापालिका प्रवेशद्वारालगत, दापोडीतील सुविधा भूखंड, फुगेवाडीतील लोकमान्य टिळक मीनाताई बाळासाहेब ठाकरे प्राथमिक शाळेची जागा, तिरंगा हॉटेलच्या पाठीमागील सुविधा भूखंड, वल्लभनगर येथील जागा या महत्वाच्या ठिकाणच्या मोकळ्या जागा मेट्रोला हव्या आहेत, असे प्रस्तावात नमूद केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"