पिंपरी-चिंचवडच्या २५ सोसायट्यांत केंद्र

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची १०० टक्के मतदानासाठी व्यापक मोहीम
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने हाऊसिंग सोसायटी फेडरेशन आणि गृहनिर्माण संघटनांच्या सहकार्याने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये १०० टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले आहे. पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या मतदारसंघांतील २५ हाऊसिंग सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यापैकी १२ केंद्रे चिंचवडमध्ये, ६ पिंपरीमध्ये आणि ७ भोसरीमध्ये आहेत.
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समन्वय बैठकीत, पीसीएमसीचे अधिकारी आणि सोसायटी प्रतिनिधींनी मतदार जागरूकता वाढवण्यासाठी उपायांवर चर्चा करण्यात अली होती. या बैठकीला उपायुक्त अण्णा बोदडे, मतदार नोंदणी अधिकारी पंकज पाटील आणि सहकारी गृहनिर्माण फेडरेशनचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पीसीएमसीने जनजागृती मोहिम सुरू केली आहे आणि ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या (Know Your Polling Station)’ ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेमुळे नागरिकांना हेल्पलाइन क्रमांक (८८८८००६६६६) वरून त्यांचे मतदान केंद्र शोधता येईल.
हाऊसिंग सोसायट्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे जनजागृती आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले असून, सोसायटी नेत्यांनी पीसीएमसीच्या मतदान सुलभतेच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले आहे. सहकारी गृहनिर्माण संघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड महापालिकेने मतदानासाठी उपलब्ध केलेल्या सुविधा, सोसायट्यांमध्ये अधिकाधिक मतदार सहभाग सुनिश्चित व्हावा यासाठी कार्यान्वित केल्या जातील.”
कोणत्या सोसायट्यांमध्ये आहेत बुथ?
चिंचवड विधानसभा मतदारसंघ
स्वीस काउंटी (थेरगाव), आशियाना मिडोस, सोनिगरा विहार (काळेवाडी), राजवीर पॅलेस – फेज १ (पिंळे सौदागर), सिद्धिविनायदक जिंजर (पिंपळे सौदागर), निसर्ग आनंद (पिंपळे निलख), सेलेस्टियल सिटी (रावेत), फाइव्ह गार्डनर (रहाटणी), विंडवर्ड (कस्पटे वस्ती, वाकड).
पिंपरी विधानसभा मतदारसंघ
त्रिवेणी (म्हाडा कॉलनी, मोरवाडी), रीवरडेल (म्हाडा कॉलनी, मोरवाडी), मंत्री इटरनिटी (कासारवाडी)
भोसरी विधानसभा मतदारसंघ
चिखली घरकुल प्रकल्प – मधूर मिलन सोसायटी (३ बूथ), केंद्रीय विहार (भोसरी, प्राधिकरण – ३ बूथ),वयाज सोसायटी (मोशी, बोऱ्हाडेवाडी)