विश्वबंधुत्व, एकात्मता आणि सद्भावनेचा संदेश विद्यार्थ्यांच्या स्वरांतून गुंजला!

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त महापालिका शाळांमध्ये पसायदान पठणाचा गजर
पिंपरी : भक्तीच्या बहरात, ज्ञानाच्या गजरात आणि एकतेच्या स्वरात… पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये आज पसायदानाचे मंगल पठण घुमले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त साकारलेल्या या उपक्रमाने शाळांचे प्रांगण भक्तिभाव, सद्गुण आणि समाजहिताच्या सुवासाने दरवळून गेले.

संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर (७५० वे) सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये, राज्य शासनाच्या निर्देशानुसार आज सकाळी पसायदान पठण करण्यात आले. पसायदान हे केवळ प्रार्थना नसून विश्वबंधुत्व, एकात्मता, सद्भावना आणि समाजहिताची प्रेरणा आहे. या पठणातून विद्यार्थ्यांमध्ये सद्गुणांची जडणघडण, परस्पर सन्मानाची भावना, तसेच समाजासाठी नि:स्वार्थ सेवा करण्याचा संकल्प जागृत करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आला.
या विशेष उपक्रमात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि शालेय व्यवस्थापन समित्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शाळांच्या प्रांगणात सकाळच्या मंगल वातावरणात झालेल्या पठणामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. विद्यार्थ्यांनी एकसुरात पसायदान पठण करून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या शिकवणीचा संदेश समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पाठ्यपुस्तकातील शिक्षण पुरेसे नाही, तर सांस्कृतिक व मूल्याधारित उपक्रमांचीही तितकीच आवश्यकता आहे. पसायदान पठणातून विद्यार्थ्यांच्या मनात नैतिकता, सामूहिकता आणि सेवा भाव वृद्धिंगत होतो. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. – किरणकुमार मोरे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका