गणेशोत्सवापूर्वी शहर खड्डेमुक्त करण्याची मागणी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : गणरायाचे आगमन आणि विसर्जन मार्गात अडथळा ठरणारे खड्डे पुढील आठवड्यात बुजविण्यात यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शुक्रवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेत घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले.
शहर खड्डेमुक्त झाले पाहिजे, या मागणीसाठी मनसेतर्फे पाठपुरावा करण्यात येत होता. परंतु याची दखल न घेतली दापोडी येथील मेट्रो स्टेशनच्या खाली असणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करीत आंदोलन करण्यात आले. त्यानंतर महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी निकम यांची भेट घेतली.
आंदोलनात महिला शहराध्यक्ष सीमा बेलापूरकर, विशाल मानकरी, चंद्रकांत दानवले, राजू सावळे, मयूर चिंचवडे, दत्त देवतरासे, विनोद भंडारी, रुपेश पटेकर, तुकाराम शिंदे, नितीन चव्हाण, निलेश कांबळे, नारायण पठारे, प्रतीक वाळुंज यांनी सहभाग घेतला होता.
शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले, राज्यात गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक त्या तातडीच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे. शहरातील विविध ठिकाणी रस्ते पहिल्याच पावसात खराब झाले आहेत. रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत.यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे बुजवण्यासाठी बारीक खडी टाकण्यात आली होती परंतु त्या ठिकाणी घसरून वाहनांचे अपघात होत आहेत.