‘पुण्यश्लोक’ महानाट्यातून सादर झाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जीवनपट!

पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन
पिंपरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून विचार प्रबोधन पर्वाची सुरुवात करण्यात आली.
प्रबोधन पर्व उद्घाटन कार्यक्रमास माजी नगरसदस्य राजू दुर्गे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,सामाजिक कार्यकर्त्या विना सोनवलकर, बंडू मारकड, राजेंद्र गाडेकर, आशा काळे, धनंजय तानले, महावीर काळे, शारदा मुंडे, रेखा दुधभाते, दत्ता शेंडगे, नरेंद्र चऱ्हाटे, बिरू बनमाने, नवनाथ बिडे, निखील पडळकर, महादेव कवितके, अजय पाताडे, शोभा भराडे, राजश्री जायभाये, कविता पाटील, बापू गडदे, यशोधन नायकवडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर म्हणाल्या की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्व:कर्तुत्वाने सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित असलेले लोककल्याणकारी राज्य अनेक वर्षे चालवले. त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रबोधन पर्वाच्या सुरवातीला ऑल इन वन निर्मित आणि के. डी. कड प्रस्तुत ‘खेळ पैठणी’ हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. खेळ पैठणीच्या या भव्य कार्यक्रमात सुनिता काळे यांना प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी तर आरती पाटील यांना द्वितीय क्रमांकाचे आणि छाया नाईकवाडे यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

दुपारच्या सत्रात शाहीर यशवंत जाधव यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जीवनावर आधारित शाहिरी सादर केली. त्यानंतर सादर झालेल्या पुण्यश्लोक फाउंडेशन निर्मित धनंजय तानले प्रस्तुत,श्रीकृष्ण परांजपे लिखित व गणेश इनामदार दिग्दर्शित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्वाभिमानी व आदर्श वाटचालीचे दर्शन घडवणारे “पुण्यश्लोक ” हे महानाट्य पार पडले. या महानाट्यास महिला व नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश भोसले यांनी केले.
या तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वामध्ये उद्या दूस-या दिवशी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे उद्या शुक्रवारी दुपारी ३ वाजता महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवणारा,भूपाळी, पिंगळा, वासुदेव, गोंधळी,धनगरी नृत्य,शाहिरी पोवाडे अशा अनेक लोककलेचा “सुवर्ण महाराष्ट्राचा लोकोत्सव” हा कार्यक्रम तसेच सायंकाळी ५ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे यांचे व्याख्यान असे प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत.