सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत शिंदेंसह दिग्गज गायकांच्या स्वरांतून उमटला लोकशाहीचा गौरव!

स्वरांनी उजळला संविधानाचा दीप
पिंपरी : भारतीय संविधानाची महती विशद करत गौरवगान करणाऱ्या “जागर संविधानाचा” या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वडील दिवंगत गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या गीतांचे सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत शिंदे यांनी जादुई स्वरांतून सादर केलेले भारतीय संविधानाचे गौरवगान …रसिकांची मिळालेली उत्स्फुर्त दाद..अशा देशभक्तीमय वातावरणात संविधानाचा दीप उजळला.

भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ आयोजित प्रबोधन कार्यक्रमाच्या समारोपीय सत्रात “जागर संविधानाचा” हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत शिंदे यांच्यासह प्रसिद्ध गायक अजय क्षीरसागर, रेश्मा सोनवणे, राधा खुडे आणि विजय कावळे यांनी भारतीय संविधान व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गौरव गीते गायली. दिवंगत गायक प्रल्हाद शिंदे यांच्या आठवणी यानिमित्त जागवल्या गेल्या.
संविधान आहे, किती शोभतोय भीमराव आपला या संविधानावर, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं अशी सरस गाणी कार्यक्रमामध्ये सादर करण्यात आली. सादरीकरणाला उपस्थित नागरिकांनी उभे राहून टाळ्यांचा प्रतिसाद दिला.
सर्व समाज घटकांचा विचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संविधान लिहिले आहे. म्हणून आज सर्व धर्मीय लोक मोठ्या गुण्यागोविंदाने राहात आहेत, असे सांगत सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत शिंदे यांनी त्यांचे वडील सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील भजन ‘विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत’, तर कव्वाली ‘उड जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली’ सादर करून रसिकांच्या मनाला साद घालत सर्वधर्मसमभावाचा विचार मांडला. “जरी संकटाची काळरात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती” हे गीत सादर करून बाबासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत उपेक्षितांचे जीवनमान उंचावण्यासाठी भारतीय संविधानाचे सर्वव्यापी लिखाण केल्याची भावना व्यक्त केली. यावेळी चंद्रकांत शिंदे यांनी आपल्या आवाजाने या गाण्यांचे मूळ गायक प्रल्हाद शिंदे यांची आठवण उपस्थित नागरिकांना करून दिली.

