फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

विकसित भारताचे पायाभूत स्तंभ लाईटहाऊस केंद्रांतून घडणार: आमदार शंकर जगताप

विकसित भारताचे पायाभूत स्तंभ लाईटहाऊस केंद्रांतून घडणार: आमदार शंकर जगताप

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने निर्मित किवळे लाईटहाऊस केंद्राचे उद्घाटन
पिंपरी : शहरातील विविध उद्योगधंद्यांसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करण्याची फॅक्टरी लाईटहाऊस आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून देश ज्या गतीने पुढे जात आहे, त्या विकसित भारताचे मजबूत पायाभूत स्तंभ या लाईटहाऊस केंद्रांमधून घडणारे युवकच असतील, असे मत आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महापालिका समाज विकास विभाग आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या किवळे येथील नवीन लाईटहाउस केंद्राचे उद्घाटन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या कार्यक्रमास माजी पक्षनेते नामदेव ढाके, महापालिका सहायक आयुक्त राजाराम सरगर, प्रशासन अधिकारी अनिता बावीसकर, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मुठाळ, मिलींदकुमार भोसले, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या सहसंस्थापक रूची माथुर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुजा किशोर, मुख्य कार्यक्रम अधिकारी अमृता बहुळकर तसेच लाईटहाऊसमध्ये प्रशिक्षण घेणारे युवक व महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, शहरात सध्या ११ लाईटहाऊस केंद्रे कार्यरत आहेत. परंतु आजच्या वाढत्या कौशल्य गरजा, उद्योगधंद्यांची वाढती अपेक्षा आणि युवकांच्या भावी संधी लक्षात घेता लाईटहाऊस केंद्रांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. आजच्या काळात स्किल्ड मॅनपावरची सर्वाधिक मागणी आहे. उद्योगधंद्यांपासून ते सेवा क्षेत्रापर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रशिक्षित, सक्षम आणि जबाबदार तरुणांची आवश्यकता वाढत चालली आहे. हीच गरज पूर्ण करणारी अत्याधुनिक कौशल्यनिर्मितीची ‘फॅक्टरी’ म्हणजे लाईटहाऊस केंद्र आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभाग आणि लाईटहाउस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २०२१ पासून युवक कौशल्यविकासासाठी संयुक्त उपक्रम राबविण्यात येत आहे.

युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे ध्येय
या शहरव्यापी उपक्रमाअंतर्गत २०२७ पर्यंत ३५,००० युवकांची रोजगारक्षमता वाढविणे आणि २० हजार युवकांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. आजपर्यंत महापालिका क्षेत्रातील १०,५०० पेक्षा अधिक युवकांनी फाउंडेशन कोर्सचे प्रशिक्षण पूर्ण केले असून ४,८०० हून अधिक युवकांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. याशिवाय १०० पेक्षा अधिक स्किलिंग पार्टनर्स आणि ५०० पेक्षा अधिक उद्योगसमुहांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"