नवनिर्वाचित सदस्यांची पहिलीच विशेष सर्वसाधारण सभा संपन्न!

स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड जाहीर
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेची नवनिर्वाचित सदस्यांची पहिलीच विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. पहिल्याच सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन नवनिर्वाचित सदस्यांनी कामकाजातील सहभाग दाखवून दिला आहे. महापालिका स्थायी समितीच्या सोळा सदस्यांची निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवी लांडगे होते

पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट असून गेल्या वर्षभरात वीस हजार पेक्षा जादा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. याबाबत महापालिकेने काय कारवाई केली असा प्रश्न माजी उपमहापौर राजू मिसाळ यांनी उपस्थित केला.मागील चार वर्षात नगर सदस्य नसल्याने अधिकारी वर्ग कार्यकर्त्यांना याबाबत कोणतीही दाद देत नव्हते .आता महापालिका अधिकाऱ्यांनी याबाबत काय नियोजन केले याची माहिती सभागृहाला मिळावी अशी त्यांनी मागणी केली.
याशिवाय गेल्या पाच वर्षांपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याचे सदस्यांनी सभागृहात उघड केले. शहरातील अनेक भागात आजही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार सदस्यांनी केली. याबाबत पाणीपुरवठा विभाग समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही .पादचारी मार्ग, रस्ता अरुंद प्रकरणी, स्मार्ट सिटी असे अनेक विषय सभागृहात जोरदारपणे मांडण्यात आले.
स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड
या सभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. गटनेत्यांनी आपापल्या पक्षातील नगरसेवकांची नावे बंद लिफाफ्यातून महापौरांकडे सादर केली.
स्थायी समितीत भाजपचे वर्चस्व कायम राहिले असून पक्षाकडून अभिषेक बारणे, शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबा त्रिभुवन आणि शितल वर्णेकर यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे आणि विकास साने यांना स्थायी समितीवर संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून सुलभा उबाळे यांची निवड जाहीर करण्यात आली.

