वेस्ट टू एनर्जी, प्लास्टिक टू फ्युएल, कचरा प्रक्रिया व बायोमायनिंग साईटची आयुक्तांनी केली पाहणी!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मोशी येथील विविध प्रकल्पांना भेट देत कामकाजाचा सखोल आढावा घेतला. यावेळी आयुक्त यांनी वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासोबतच प्लास्टिक टू फ्युएल प्रकल्प, हॉटेलमधील सेंद्रिय कचऱ्यावर आधारित बायोगॅस प्रकल्प, बांधकाम व पाडकाम (C&D) कचरा प्रक्रिया प्रकल्प तसेच बायोमायनिंग साईटचीही पाहणी केली. पुढील काळात या सर्व प्रकल्पांची कार्यक्षमता अधिक वाढविण्यावर विशेष भर दिला जाईल. असे आयुक्त, डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

या भेटीदरम्यान मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी आयुक्तांना प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सर्व प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. तसेच, प्रत्यक्ष पाहणीदरम्यान कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया आणि त्यापासून ऊर्जा निर्मिती या विविध टप्प्यांबाबत तांत्रिक माहिती समजावून सांगत प्रकल्पाची कार्यपद्धती, कार्यक्षमता, सुरक्षितता आणि पर्यावरणीय परिणाम यांची माहिती दिली.
या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट, उप अभियंता पंकज धेंडे, कनिष्ठ अभियंता दशरथ वाघोले, कनिष्ठ अभियंता स्वालिहा मुल्ला, आरोग्य निरीक्षक सुशील मलैये तसेच प्लांट हेड अशोक गुप्ता आणि सल्लागार स्वरूप लगारे उपस्थित होते.
प्रकल्प अधिक सक्षम, पारदर्शक आणि शाश्वत पद्धतीने कार्यान्वित राहण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, तसेच नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत जागरूकता वाढविण्याची गरज असल्याचेही आयुक्तांनी यावेळी अधोरेखित केले.
वेस्ट टू एनर्जीपासून बायोमायनिंगपर्यंत एकात्मिक कचरा व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल
शहरातील कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारला गेला असून, महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच मोठा प्रकल्प आहे. शहरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर उपाय शोधत त्यातून वीज निर्मिती करण्याचा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. दररोज सुमारे ७०० ते १,००० मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याची त्याची क्षमता आहे व या प्रकल्पातून सुमारे १४ मेगावॅट प्रतितास वीज निर्मिती केली जाते.
प्रकल्पासाठी कचऱ्यापासून मिळवलेले इंधन (आरडीएफ) आधारित नियंत्रित ज्वलन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, पुनर्वापर न होणाऱ्या सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील कचऱ्याचा दररोज सुमारे १,००० टनांचा भार कमी होण्यास मदत होत असून, वार्षिक पातळीवर लाखो टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. सदर प्रकल्पात निर्मित वीज ही महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांना तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला पुरवली जात असून त्यामुळे महापालिकेच्या वीज खर्चात मोठी बचत होत आहे.
भविष्यात या प्रकल्पाचा विस्तार करण्याचा मानस असून, सुमारे २७ मेगावॅट क्षमतेचा दुसरा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासोबतच परिसरात प्लास्टिक टू फ्युएल प्रकल्पाद्वारे प्लास्टिक कचऱ्याचे इंधनात रूपांतर, हॉटेलमधील सेंद्रिय कचऱ्यावर आधारित बायोगॅस प्रकल्प, बांधकाम व पाडकाम (C&D) कचरा प्रक्रिया प्रकल्प तसेच बायोमायनिंग साईटच्या माध्यमातून जुन्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे कामही प्रभावीपणे सुरू असून, एकात्मिक कचरा व्यवस्थापनाची यशस्वी अंमलबजावणी येथे करण्यात येत आहे.

