कुदळवाडीतील बेकायदेशीर स्क्रॅप दुकाने हटवा

भंगार दुकानवाल्याविरोधात सोसायट्या आक्रमक; महापालिका आयुक्तांना निवेदन
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : कुदळवाडी परिसरातील सर्व बेकायदेशीर स्क्रॅपची दुकाने, कारखाने, शॉप , गोडाऊन यांच्यावर कारवाई करून ही सर्व या भागातील अनधिकृत गोदामे हटवण्यात यावीत, अशी मागणी चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केली आहे.
कुदळवाडी, मोशी, चिखली या परिसरामध्ये रहिवासी झोनमध्ये चार ते पाच हजार बेकायदेशीर, अनाधिकृत, कोणतीही परवानगी न घेता स्क्रॅपची दुकान, कारखाने, शॉप, गोडाऊन चालू आहेत. या ठिकाणी अनेक बेकायदेशीर धंदे केले जातात. तसेच या ठिकाणी लोखंड बारीक करणे, प्लास्टिक जाळणे, इतर विघातक ज्वलनशील पदार्थ जाळणे, अशा अनेक गोष्टी घडतात त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण, तसेच नदीच्या कडेला हे व्यवसाय असल्याने जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. या सर्व बेकायदेशीर गोष्टीमुळे या ठिकाणी मागच्या एका वर्षामध्ये ४० वेळा आगीच्या घटना घडलेल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागली होती.
..अन्यथा आंदोलन
सोसायटी फेडरेशनकडून महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. तरीदेखील डोळेझाक करून कोणतीही कारवाई केली जात नाही, ही अतिशय चुकीची आणि गंभीर बाब आहे. महापालिका प्रशासनाने पुढील महिन्याभरात या सर्व बेकायदेशीर गोष्टीवर कारवाई न झाल्यास आमच्या फेडरेशन तर्फे याबाबत लोकशाही मार्गाने आंदोलने व इतर घटनात्मक गोष्टी केल्या जातील, याची नोंद घ्यावी, असा इशाराही सोसायटी फेडरेशनने दिला आहे.
यासंदर्भात चिखली-मोशी-चऱ्होली -पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी सांगितले की, कुदळवाडी, मोशी, चिखली या परिसरामध्ये हजारो बेकायदेशीर स्क्रॅपची दुकान, गोडाऊन, शॉप्स आहेत. या ठिकाणी बेकायदेशीरपणे रबर, प्लास्टिक इतर ज्वलनशील पदार्थ जाळले जातात. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. तसेच, या ठिकाणी अनेक अनाधिकृत धंदे देखील चालवले जातात, याबाबत वारंवार तक्रार करून देखील महापालिका त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नाही. यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अन्यथा फेडरेशन मार्फत खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल.