फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
अध्यात्म

भंडारा डोंगरावर दशमी सोहळा संपन्न

भंडारा डोंगरावर दशमी सोहळा संपन्न

दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी, गाथा पारायण, कीर्तन आदी कार्यक्रम

देहू, ता. ७ : वारकरी संप्रदायात अनन्य साधारण महत्त्व असलेला आणि एक मोठी परंपरा लाभलेला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अनुग्रह दिवस असलेला अर्थात माघ शुद्ध दशमीचा सोहळा आज श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने डोंगरावर दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

माघ शुद्ध दशमी हा जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचा अनुग्रह दिवस म्हणून ओळखला जातो.तो हा साक्षात्कार दिन होय. तुकोबा स्नानाला जात असताना वाटेत सदगुरुरायांनी त्यांना गाठले, मस्तकी हात ठेवत भोजनासाठी पावशेर तुप मागितले. सदगुरुरायांनी राघवचैतन्य, केशवचैतन्य ही गुरुपरंपरा सांगत स्वतःचे नाव बाबाजी सांगत संत तुकोबारायांना ‘रामकृष्ण हरी’ हा सोपा मंत्र दिला. गुरूंचा अनुग्रह, साक्षात्कार झाला तो दिवस म्हणजे माघ शुद्ध दशमी.

शके १५५४ (इ.स.१६६२) वारकरी संप्रदायात या माघ शुद्ध दशमीला अनन्य साधारण असे महत्त्व असून एक मोठी परंपरा आहे. म्हणूनच गेली ७१ वर्षे श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर ‘अखंड हरिनाम सप्ताह, गाथा पारायण व कीर्तन महोत्सवाचे’ मोठ्या स्वरूपात आयोजन करण्यात आलै. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मंदिरापुढे मोठी रांग लागली होती. पहाटे काकड आरती संपन्न झाल्यानंतर श्री विठ्ठल-रखुमाई व जगदगुरू तुकोबारायांच्या मूर्तींना संत तुकाराम साखर कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष माजी खासदार नानासाहेब नवले, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, संचालिका ताराबाई सोनावणे, संचालक सुभाष राक्षे यांच्या शुभहस्ते अभिषेक करून महापूजा करण्यात आली.

दिंड्यांचा सभामंडपात जयघोष
महापूजा झाल्यानंतर सकाळच्या सत्रात जालना जिल्ह्यातील वाकुळणी येथील संतपीठाचे प्रमुख नाना महाराज तावरे यांचे ‘गाथा पारायण’ झाले. सकाळपासूनच पुणे जिल्ह्याच्या विविध भागातून विठ्ठल नामाचा गजर करत आणि अनेक दिंड्या डोंगरावर आल्या होत्या. डोंगरावर आल्यानंतर सर्वच दिंड्यांनी मंदिराला प्रदक्षिणा घालून सभामंडपात ‘ज्ञानोबा माऊली – तुकाराम’ असा जयघोष केला.

दुपारी १२ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते, प्रा. गणेश शिंदे व ‘सूर नवा – ध्यास नवा’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या विजेत्या, सुप्रसिद्ध गायिका सौ. सन्मिता शिंदे व सहकलाकारांचा जगदगुरू तुकोबारायांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘तुका आकाशा एवढा’ हा अभंगवाणीचा कार्यक्रम झाला. इंद्रायणीने तारलेली तुकोबारायांची गाथा, अवली जिजाईने तुकोबारायांसाठी घेतलेले कष्ट, बाळ वेषात साक्षात पांडुरंगाने आई जिजाऊंच्या पायातील काढलेला काटा, छत्रपती शिवाजी महाराज व तुकोबारायांची भेट असे तुकोबारायांच्या जीवन चरित्रातील विविध प्रसंगांचे प्रा. गणेश शिंदे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत निरूपण करीत रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.. सन्मिता शिंदे यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, ‘या शेजारणीने बरं नाही केले बया’, ‘बोलावा विठ्ठल.. पाहावा विठ्ठल’, रुखमाई रुसली कोप-यात बसली’ अशा विविध अभंग रचना सादर करीत उपस्थित श्रोत्यांची दात मिळवली.

बहुरूपी भारूड
दुपारी दोन नंतर डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठान प्रस्तुत डॉ. भावार्थ देखणे, अवधूत गांधी, अभय नलगे, पांडुरंग पवार आदी ३५ कलावंतानी ‘बहुरूपी भारूडाचा’ बहारदार कार्यक्रम सादर केला. या सर्व कलाकारांनी ‘दुर्लभ नर देह जाणा, शतवर्षांची गणना, ज्यामध्ये दुख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा,’ हे गीत गात वासुदेवाचे रूपक सादर केले. ‘बये दर उघड, बये दर उघड’ हे संत एकनाथांचे कडकलक्ष्मीच्या रुपातील गीतरचना, संत तुकोबारायांचा ‘आम्ही गोंधळी, गोंधळी’ हा गोंधळ अशी विविध रूपके सादर करीत श्रोत्यांची दाद मिळविली. पखवाज, संबळ, तुतारी, दिमडी अशा १२ वाद्यांच्या साथसंगतीने या भारुडाच्या कार्यक्रमाला रंगत निर्माण केली.

आज सकाळ पासून ते रात्री ११ वाजेपर्यंत सर्व भाविकांना मसालेभात व बुंदी असा महाप्रसाद देण्यात येत असून हा महाप्रसाद संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्यावतीने देण्यात येत आहे.

वासकर महाराज यांची कीर्तन सेवा
काल रात्री श्री क्षेत्र पंढरपूर येथील वासकर फडाचे प्रमुख मालक हभप श्री गुरु एकनाथ आबा वासकर महाराज यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.

चंदनाचे हात पाय ही चंदन | परिसा नाहीं हीन कोणी अंग ||
दीपा नाहीं पाठीं पोटी अंधकार | सर्वांगी साकर अवघी गोड ||
तुका म्हणे तैसा सज्जनापासून/पाहातां अवगुण मिळेंचि न ||

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगावर वासकर महाराजांनी निरुपण केले. चंदनाच्या वृक्षाप्रमाणे संताचे कार्य असते.चंदनाच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला सुगंध प्राप्त होतो.त्याचप्रमाणे संत अवताराला येवून स्वतः झिजून इतरांना सुगंध देतात.त्यांच्या जीवनाचा उद्धार करतात,असे प्रतिपादन ज्येष्ठ किर्तनकार एकनाथ आबा वासकर महाराज यांनी यावेळी केले. कीर्तन प्रसंगी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते, कात्रज दुध संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब नेवाळे, मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्ती शेटे, मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रवींद्र भेगडे, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, उपाध्यक्ष विजय सदाशिव बोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने होणारी लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस कर्मचारी बंधूनी चोखपणे बंदोबस्त ठेवत डोंगराच्या पायथ्यालाच चार चाकी व दुचाकी पार्किंगची व्यवस्था करून पायथ्यापासून बसने सर्व भाविकांना डोंगरावर मंदिराजवळ सोडण्यात येत होते. खालुम्ब्रे येथील युवा उदयोजक गणेश बोत्रे व देहूतील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल तर्फे भाविकांसाठी मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात दिली.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"