केअरटेकरने पळवले अडीच लाखांचे दागिने

वाकड : ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घेण्यासाठी कामावर ठेवलेल्या केअरटेकरने घरातून दोन लाख 63 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 29) सकाळी नऊ ते साडेनऊ वाजताच्या कालावधीत विनोदेवस्ती वाकड येथे घडली.
सुनील अशोक नगरकर (वय 47, रा. विनोदेवस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश महादेव बोबडे (वय 32, रा. बार्शी, सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील नगरकर यांच्या घरी वडिलांच्या देखरेखीसाठी आरोपी आकाश बोबडे याला केअरटेकर म्हणून कामावर ठेवले होते. शुक्रवारी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजताच्या कालावधीत आकाश बोबडे याने नगरकर यांच्या घरातून दोन लाख 63 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहे