२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर मांडणार

२१ फेब्रुवारी २०२५ रोजी विशेष सभेचे आयोजन
पिंपरी, दि. १७ फेब्रुवारी २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचे सुधारित अंदाजपत्रक आणि २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर ठेवण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
सन २०२५-२६ चे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर ठेवण्यासाठी पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे २१ फेब्रुवारी २०२५ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात येत आहे.
या विशेष सभेमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह मूळ अंदाजपत्रकाचे सादरीकरण करणार आहे. या अंदाजपत्रकात केंद्रशासनाच्या पुरस्कृत विविध योजना, प्रशासकीय सुविधा, विविध विकासकामे, भूमिपूजन, आरोग्य, स्थापत्य विषयक कामे, शहरातील नागरिकांसाठी पायाभूत सुविधा, तसेच विविध विकासकामांसाठी अत्यावश्यक निधी, तरतुदी, महसूल आदी बाबींचा तपशील देण्यात येणार आहे.