दाखल गुन्ह्यांमुळे इच्छुकाचा जामीन नाकारला

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : निवडणूक लढविणे हा मूलभूत अधिकार नाही, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने एका इच्छुक उमेदवाराचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
फलटण कोरेगाव विधानसभेची निवडणूक लढविण्यास भाजपाचे दिगंबर आगवणे इच्छुक होते. त्यांनी २०१९ मध्ये भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती. मात्र आगवणे यांना ११ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. शिवाय स्थानिक पोलिस ठाण्यात त्यांच्यावर विविध कर्जप्रकरणे, पतसंस्थांची फसवणूक, जमीन घोटाळे, खंडणी, धमकी अशा विविध आरोपांखाली गुन्हे दाखल आहेत. सध्या ते तुरुंगात शिक्षाही भोगत आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी आगवणे यांना पुन्हा उमेदवारी अर्ज सादर करायचा होता. तसेच प्रचारासाठीही तात्पुरता जामीन मिळावा, यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. ईडीच्या वतीने ज्येष्ठ वकील संदेश पाटील यांनी युक्तिवाद केला. त्यांनी खंडपीठाला सांगितले की, आगवणे यांच्यावर १२ एफआयआर दाखल आहेत. त्यामुळे त्यांना जामीन नाकारण्यात यावा. त्यानुसार न्यायालयानं हा जामीन नाकारला आहे.