मोशीतील मानाच्या विड्याची बोली लागली तब्बल २५ लाख रुपयांना!

दीड कोटींच्या लिलावाची बोली चालली सात तास
मोशी : संपूर्ण महाराष्ट्रात मानाच्या विड्याच्या लिलावासाठी लाखोंची बोली लावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सवातील लिलावामध्ये या वर्षीच्या मानाच्या विड्याला तब्बल २५ लाख रुपयांची बोली लावली गेली. हा विडा मोशीतील जगदीश श्रीपती जाधव-सस्ते यांनी घेतला.
श्री नागेश्वर महाराज यांचा आशिर्वादच जणू आपणास मिळाला आणि या आशिर्वादानेच आपले कुटुंब व मोशी ग्रामस्थ सुखी आहेत. त्यामुळेच आपण हा विडा घेतला असल्याची प्रतिक्रीया यावेळी जगदीश श्रीपती जाधव-सस्ते यांनी दिली. तर मानाची ओटी रोहीदास विष्णू घिगे (हवालदार) १७ लाख५२ हजार, आकाश विष्णू सस्ते मानाचे शेवटचे लिंबू ११ लाख १ हजार १०१, लिलावाची सुरुवात ज्या विड्याने झाली तो मानाचा पहिला विडा भालचंद्र बोराटे ७ लाख ५१ हजार रूपये, पहिले लिंबू संभाजी बबन बोऱ्हाडे १ लाख ७१ हजार रूपयांना घेतले. देवाच्या दारात पैशाला मोल नाही हेच खरं, याचा प्रत्यय करून देणारा हा लिलाव आहे. त्या लिलावात सुरुवातीपासून शेवटपर्यंत बसणाऱ्याला हे हमखास जाणवतं. ‘नागेश्वर महाराजांच्या सानिध्यातील वस्तू, प्रसाद घेईल त्याला भरभराट’ या अशा शब्दात व भारदस्त आवाजात उत्सवातील लिलावात पुकार करण्याचे काम केदारी कुटुंबातील नारायण निवृत्ती केदारी, सागर नारायण केदारी हे करत होते.
सकाळी दहा वाजल्यापासून शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोशीतील ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज मंदीर येथे भंडाऱ्यातील विविध वस्तूंचा लिलाव सुरु होता. सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत हा लिलाव सुरु होता. सुमारे एक कोटी २४ लाख रूपयांचा लिलाव करण्यात आला.
या वस्तूंचा होतो लिलाव
दरवर्षी या लिलावामध्ये भाविकांना अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा व भंडाऱ्यातील प्रसाद व लिंबू अशा वस्तूंची बोली लावून लिलाव केला जातो. ग्रामस्थांकडून भंडाऱ्यातील महाप्रसाद बनविण्याची भांडी दरवर्षी नव्याने खरेदी केली जातात. मानाची ओटी आणि मानाचे लिंबू हे लिलावातील महत्ताचे मानले जाते.
केदारी यांचा यंदा ग्रामस्थांच्यावतीने उभा पोशाख, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. उत्सवातील वस्तूंचा लिलाव हा पंचक्रोशीतील भाविकांच्या दृष्टीने एक विशेष पर्वणीचा सण असतो.त्यामुळे लिलाव पाहण्यासाठी सभा मंडपामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आता यंदादेखील या मानाच्या विड्याची पंचक्रोशीत चर्चा सुरू झाली आहे.

