भोसरी विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा नाद, सजवलेल्या रथांची शोभा!

छत्रपती शिवाजी महाराज चौकात गणेश मंडळांचा महापालिकेच्या वतीने सन्मान
पिंपरी : पारंपरिक वाद्यांचा नाद, सजवलेल्या रथांची शोभा आणि गणेश मंडळांच्या विविध उपक्रमांना नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद… अशा उत्साहमय वातावरणात भोसरी परिसरात शुक्रवारी (५ सप्टेंबर) गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली. या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांचे भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. या ठिकाणी गणेश मंडळांची मिरवणूक आल्यानंतर मंडळांच्या प्रतिनिधींचा सन्मान करून त्यांचा गौरव करण्यात आला.
महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता शिवराज वाडकर, संतोष दुर्गे, क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,सहाय्यक आरोग्याधिकारी राजेश भाट यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या मंडळांचा करण्यात आला सन्मान
कानिफनाथ मित्र मंडळ भोसरी (गावठाण), छत्रपती मित्र मंडळ भोसरी, लांडगे लिंबाची तालीम भोसरी, कै. दामूशेठ गव्हाणे मित्र मंडळ गव्हाणे वस्ती भोसरी, लांडगे ब्रदर्स अँड फ्रेंड्स सर्कल भोसरी (गावठाण), श्रीराम मित्र मंडळ लांडगे आळी भोसरी, नरवीर तानाजी तरुण मंडळ दिघी रोड, उंबऱ्या गणपती मित्र मंडळ दिघी रोड, अष्टविनायक मित्र मंडळ दिघी रोड, समस्त गव्हाणे तालीम मित्र मंडळ भोसरी, मधले फुगे तालीम भोसरी (गावठाण), श्रीकृष्ण मित्र मंडळ गवळी नगर, नायसाहेब प्रतिष्ठान भोसरी (गावठाण), नवज्योत गणेश मित्र मंडळ, पठारे लांडगे तालीम भोसरी गाव, खंडोबा मित्र मंडळ खंडोबा माळ, फुगे-माणे तालीम मित्र मंडळ.
विसर्जन घाटांवरील व्यवस्था
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जन घाटांवर कृत्रिम विसर्जन हौद, निर्माल्य कुंड, मूर्ती संकलन केंद्र अशा विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भोसरी येथे अनेक मंडळांनी कृत्रिम हौदांचा वापर करून मूर्ती विसर्जित केल्या, तर काहींनी महापालिकेच्या संकलन केंद्रांना मूर्तीदान करण्याचा उपक्रम राबवला. विसर्जन घाटांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने विसर्जन घाटांवर जीवरक्षक, सुरक्षा पथक, आपत्ती व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिका, वैद्यकीय व आरोग्य पथक अशा सर्व यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत.