महापालिकेत प्रजासत्ताकदिन साजरा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते राष्ट्रवंदन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमृतमहोत्सव साजरा करण्याचा हा सुवर्णक्षण आहे. आपण सर्व मिळून एकजुटीने कार्य करूया आणि आपले शहर, आपला देश अधिक प्रगत, स्वच्छ आणि हरित बनविण्याचा संकल्प करूया आणि भारतीय संविधानाची मूल्ये जोपासत आपल्या देशाला अग्रेसर बनविण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
या राष्ट्रध्वजारोहण समारंभास आमदार उमा खापरे, माजी महापौर योगेश बहल, माजी उपमहापौर राजू मिसाळ, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा वित्त संचालक प्रविण जैन, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे तसेच विविध विभागांचे प्रमुख, महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान प्रास्ताविकेचे वाचन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराने देखील अल्पावधीच विकासाच्या दिशेने झेप घेतली आहे. देशातील महत्वाच्या शहरांमध्ये पिंपरी चिंचवडचे नाव प्रामुख्याने घेतले जाते, ही आपल्या शहराच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रत्येक उपक्रमांमध्ये शहरातील सर्व घटकांचा सहभाग महत्वाची भूमिका बजावत असून नागरिकांना उत्तम आणि दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा अविरतपणे कार्यरत आहे. शहराला गौरवशाली इतिहास आणि संतांची परंपरा लाभलेली आहे. ही परंपरा अबाधित ठेऊन शहराला स्वच्छ व सुंदर तसेच राहण्यायोग्य शहर बनविण्यासाठी महापालिकेची वाटचाल यशस्वी ठरत आहे. येत्या काळात देशातील स्वच्छ व सुंदर तसेच राहण्यायोग्य शहर म्हणून पिंपरी चिंचवड शहराचा नामोल्लेख प्रामुख्याने केला जाईल असा विश्वास वाटतो.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापन होऊन सन २०३२ साली ५० वर्ष पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने “व्हीजन@५० शहर धोरण” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ५० व्या वर्षात पिंपरी चिंचवड शहर कसे असावे, याबाबत विचार विनिमय आणि मंथन केले जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शहराच्या भविष्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध पायाभूत सुविधा, प्रकल्प उभारण्याबाबत नियोजन आणि निवड करण्यास हातभार लागणार आहे.