भारताचा न्यूझीलंडवर 4 गडी राखून विजय;चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरले नाव!

दुबई : हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने अखेर 12 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. धोनीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते. त्यानंतर आता रविवार 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, कर्णधार रोहित शर्माच्या दमदार खेळीच्या बळावर टीम इंडियाने न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 9 महिन्यांत दुसरी ट्रॉफी जिंकली आहे. 2024 चा टी-20 व जिंकल्यानंतर, रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 12 वर्षांनी पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. यासह, टीम इंडियाने 25 वर्षांपूर्वी याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदला घेतला. यासोबतच त्याने ही ट्रॉफी सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रमही केला.
अंतिम सामन्यात कर्णधार रोहितला गवसला सूर
संपूर्ण स्पर्धेत रोहितच्या बॅटमधून एकही मोठी खेळी झाली नव्हती आणि अंतिम सामन्यांमध्ये तो अर्धशतकही करू शकला नाही. त्याच वेळी, त्याच्या निवृत्तीबद्दल अटकळ सुरूच होती. रोहित शर्माने संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि आपल्या आक्रमक शैलीने न्यूझीलंडला सुरुवातीपासूनच बॅकफूटवर आणले. रोहितने जलद अर्धशतक झळकावले आणि नंतर शुभमन गिलसोबत शतकी भागीदारी केली
टीम इंडियाला येथे दोन झटपट धक्के बसले आणि शुभमन गिलनंतर विराट कोहलीही पॅव्हेलियनमध्ये परतला. लवकरच कर्णधार रोहितनेही आपली विकेट गमावली. येथून, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी 61 धावांची भागीदारी करून संघाला पुनरागमन करून दिले. श्रेयसचे अर्धशतक हुकले आणि त्यानंतर अक्षर पटेलही काही वेळातच पॅव्हेलियनमध्ये परतला. पण केएल राहुल आणि हार्दिक पंड्याने संघाला विजयाच्या खूप जवळ आणले. हार्दिक विजयापूर्वीच बाद झाला होता पण राहुलने रवींद्र जडेजासह संघाला जेतेपद जिंकल्यानंतरच सुटकेचा नि:श्वास सोडला.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंडने 50 षटकांत 7 बाद 251 धावा केल्या. भारतापुढे अंतिम सामना जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी 50 षटकांत 252 धावा करण्याचे आव्हान आहे.
सलामीवीर वील यंग 15 धावा करुन वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर पायचीत झाला. नंतर रचिन रवींद्र 37 धावा करुन कुलदीप यादवच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. तर केन विल्यमसन 11 धावा केल्यानंतर कुलदीप यादवच्या चेंडूवर त्याच्याकडेच झेल देऊन परतला. टॉम लॅथम 14 धावा केल्यानंतर रवींद्र जडेजाच्या चेंडूवर पायचीत झाला. यानंतर ग्लेन फिलिप्स ३४ धावा केल्यावर वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. डॅरिल मिशेल 63 धावा करुन मोहम्मद शमीच्या चेंडूवर रोहित शर्माकडे झेल देऊन तंबूत परतला. न्यूझीलंडचा कर्णधार असलेला मिचेल सँटनर 8 धावा केल्यानंतर धावचीत झाला. भारताकडून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी प्रत्येकी दोन तर रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी या दोघांनी प्रत्येकी एक बळी घेतला.