शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुत्रवत ज्ञान द्यावे : डॉ. विठ्ठल वाघ

पिंपरी : लायन्स क्लब इंटरनॅशनल, झोन पसायदान च्या वतीने भोसरी येथे आयोजित उपक्रमशील शिक्षक सन्मान सोहळ्यात सुमारे ६० शिक्षकांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मानपत्राचे लेखन व वाचन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले.
या सोहळ्याला ज्येष्ठ कवी, साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ, लायन्स इंटरनॅशनल प्रांत ३२३४ चे प्रांतपाल लायन राजेश आगरवाल, त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकर आप्पा गुळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. झोन चेअरमन लायन मुकुंद आवटे यांनी सर्व शिक्षकांचे स्वागत करून शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.

या वेळी बोलताना डॉ. विठ्ठल वाघ म्हणाले,शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे शिकवावे. संत गाडगे महाराज यांच्या कीर्तनादरम्यान त्यांचा मुलगा निधन पावला, तरी त्यांनी प्रेक्षकांमध्येच आपल्या मुलाला पाहून किर्तन सुरू ठेवले. त्याचप्रमाणे शिक्षकांनी दुःख बाजूला ठेवून विद्यार्थ्यांमध्ये स्वतःचे मूल पाहावे व अध्यापन करावे. डॉ. वाघ यांनी त्यांच्या गाजलेल्या तिफन कवितेचे सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली.
कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थिनींचाही गौरव करण्यात आला. जर्मनी येथील एक कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळालेली कुमारी श्रावणी टोणगे आणि नीट परीक्षेत यश मिळवलेली कुमारी श्रेया पाटील यांना शिक्षक मित्र परिवाराच्या वतीने शैक्षणिक मदत प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाची प्रस्तावना लायन मुरलीधर साठे यांनी केली, सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले तर आभार लायन लालासाहेब जगदाळे यांनी मानले.
श्रीराम विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयाच्या स्वर्गीय उमाताई गुळवे सभागृहात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झोन पसायदान मधील चारही क्लबचे सदस्य व अध्यक्ष यांनी परिश्रम घेतले.