टाटा मोटर्स कामगारांना वीस हजार पाचशे रुपयांची वेतन वाढ!

टाटा मोटर्स आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यातील वेतनवाढ सुधारणा करार
पिंपरी : येथील टाटा मोटर्स आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यातील वेतनवाढ सुधारणा करार संपन्न झाला असून एक सप्टेंबर 2025 ते 31 ऑगस्ट 2019 या चार वर्षासाठी एकूण वीस हजार पाचशे रुपयांची वेतन वाढ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे . टाटा मोटर्स व्यवस्थापनाने नेहमीच कामगारांच्या हिताचे निर्णय आज पर्यंत घेतले आहेत मुदतपूर्व वेतन वाढ करार झाल्याने प्रत्येक कर्मचाऱ्याला 25 हजार रुपयांचा बोनस व्यवस्थापनाने जाहीर केला आहे .

व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे कर्मचारी आनंदीत आहेत. टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष शिशुपाल तोमर यांनी ही माहिती दिली. या कराराचा 5000 कामगारांना फायदा होणार आहे. पगारवाढीची रक्कम चार हप्त्यात मिळणार असून पहिल्या वर्षी 65 टक्के, दुसऱ्या वर्षी 15 टक्के, तिसऱ्या वर्षी व चौथ्या वर्षी प्रत्येकी दहा टक्के वाढ लागू केली जाणार आहे . कर्मचाऱ्यांच्या थेट पगारात 17 हजार 869 आणि अप्रत्यक्ष लाभांमध्ये 2632 रुपयांची भर पडणार आहे . कर्मचाऱ्यांच्या पगारात दहा हजार आठशे रुपयांची वाढ तर एफ डी मध्ये 2372 रुपयांची वाढ होणार आहे . तसेच भविष्य निर्वाह निधी , ग्रॅज्युएटी ,उपस्थिती पुरस्कार, इन कॅशमेंट, ड्रेस व हाऊस अलाउन्स यासारख्या विविध बाबींमध्ये वाढ करण्यात आली आहे .
वेतनवाढ करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी दिवंगत रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यात आली .व्यवस्थापनाच्या वतीने उपाध्यक्ष विशाल बादशहा, प्रमोद चौधरी, विभागाचे प्रमुख अनुराग छारिया, नीरजा आगरवाल, मनुष्यबळ विकास विभाग प्रमुख आदिती गुप्ता, विवेक बिंद्रा यांनी स्वाक्षऱ्या केल्या. तर युनियनच्या वतीने अध्यक्ष शिशुपाल तोमर, सरचिटणीस अजित पायगुडे, कार्याध्यक्ष सतीश काकडे, खजिनदार औदुंबर गणेशकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या .वाटाघाटी समिती मधील युनियनचे सदस्य योगेश तळेकर, सचिन लांडगे ,अबिद अली सय्यद ,संजीव आसवले, अनंत खेडेकर, सुजित कुमार साळुंखे उपस्थित होते . व्यवस्थापनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे पूर्वीचा वेतन करार संपण्यापूर्वी नवीन करार पूर्ण करण्यात आला. हा कामगारांचा सन्मान आणि निष्ठेचा गौरव आहे आसे तोमर हांनी सांगितले.