फक्त मुद्द्याचं!

6th September 2025
पिंपरी-चिंचवड

२५० बेड क्षमतेसह तालेरा रुग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज!

२५० बेड क्षमतेसह तालेरा रुग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज!

स्त्रीरोग, बालरोग व मेडिकल विभागासह डायलिसिस सेंटर, आयसीयू, एनआयसीयू कार्यरत
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांना सक्षम आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने २५० बेड क्षमतेसह तालेरा रुग्णालय आता पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले आहे. येथे स्त्रीरोग विभाग, बालरोग विभाग, मेडिकल विभाग, डायलिसिस सेंटर, अतिदक्षता विभाग (आयसीयू) तसेच नवजात शिशु अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) या सर्व सुविधा संपूर्ण कार्यक्षमतेने सुरू झाल्या आहेत, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात आली.

vaiga vcc
vaiga vcc

स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागामुळे महिलांना वेळेवर आवश्यक तपासण्या व उपचार सहज मिळू शकतील. बालरोग विभाग सुरू झाल्यामुळे लहान मुलांच्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य व दर्जेदार उपचार मिळू शकतील. तसेच मेडिकल विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यामुळे सर्वसाधारण आजारांवर प्रभावी तपासणी व उपचार करणे सहज शक्य होईल. मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी डायलिसिस ही जीवनावश्यक प्रक्रिया असून, यासाठी नागरिकांना यापूर्वी खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी लागत होती. मात्र तालेरा रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणेसह सुरू झालेल्या डायलिसिस सेंटरमुळे रुग्णांना आता अत्यंत माफक दरात व सुरक्षित वातावरणात ही सुविधा सहज उपलब्ध झाली आहे.

तालेरा रुग्णालयात आयसीयूची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उच्च दर्जाच्या वैद्यकीय साधनसामग्रीसह प्रशिक्षित डॉक्टर व नर्सिंग स्टाफ यांच्या मदतीने तातडीच्या अवस्थेतील रुग्णांवर येथे प्रभावी उपचार करणे शक्य होईल. नवजात बालकांच्या आरोग्यासाठी येथे एनआयसीयू हे सुरू केले आहे. अकाली जन्मलेली व गंभीर अवस्थेत असलेली बालके येथे विशेष निगराणीखाली ठेवून त्यांना आवश्यक ते आधुनिक वैद्यकीय उपचार मिळू शकतील, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

नागरिकांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे ही पिंपरी चिंचवड महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. तालेरा रुग्णालय हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. २५० बेड क्षमतेसह स्त्रीरोग, बालरोग, मेडिकल विभाग, आयसीयू, एनआयसीयू आणि डायलिसिस सेंटर या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हे केवळ वैद्यकीय सोयींचा विस्तार नाही, तर नागरिकांच्या आरोग्यसुरक्षेच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. — शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

तालेरा रुग्णालयात आयसीयू, एनआयसीयू व डायलिसिस या तीनही सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांच्या मदतीने प्रत्येक रुग्णाची तपासणी करून त्यांना योग्य उपचार दिले जातील. — डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

……

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"