हज यात्रेच्या आमिषाने 11 लाखांची फसवणूक!

पिंपरी : मक्का- मदीना येथे हज यात्रेला पाठविण्याचे आमीष दाखवून अकरा लाख रुपये घेतले, मात्र यात्रेला न पाठविता आणि पैसेही परत न करता आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी फैयाज अमीर शेख (वय 60, रा.नढेनगर, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. रियाज शेख (रा.नढेनगर, काळेवाडी), अमीर सरदार शेख (रा. भवानी पेठ, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रियाज शेख याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी अल- खलिफा टूर्स अँड ट्रॅव्हल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना हज यात्रेसाठी मक्का- मदीना येथे पाठवण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी पाच मार्च 2026 रोजी कंपनीच्या बँक खात्यात 11 लाख रुपये जमा करून घेतले. मात्र त्यानंतर यात्रेची व्यवस्था केली नाही. फिर्यादीने पैसे परत मागितल्यानंतरही रक्कम परत न करता टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. काळेवाडी पोलीस तपास करीत आहे.

कंपनीतील कच्च्या मालाच्या 64 बॅगा चोरीला!
पिंपरी : कंपनीतील कच्च्या मालाच्या 64 बॅगा वाहनातून चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविवार दिनांक 4 ते 5 ऑक्टोबर पहाटे दरम्यान ही घटना घडली आहे.
याप्रकरणी संतोष दिनकर आडके (वय 40, रा. तळेगाव दाभाडे) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खंडू रोहिदास सूर्यवंशी (वय 33, मूळ- रा. पोखरभोशी, जि. नांदेड )असे गुन्हा दाखल झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज कंपनीतील ‘पीसी इन्फिनोएससी-1220 युआर’ कच्च्या मालाच्या 64 बॅगा जाधव ट्रान्सपोर्टच्या मारुती सुपर कॅरी वाहनातून सूर्यवंशी यांनी कंपनीच्या परवानगीशिवाय चोरून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

