भोसरी मतदारसंघांत जोरदार शक्तिप्रदर्शन ;महाविकास आघाडीतर्फे अजित गव्हाणे यांचा अर्ज दाखल

परिवर्तनाची नांदी ठरणार
भोसरी : महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे सोमवारी (दि.२८) दुपारी दीड वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या चरणी श्रीफळ वाढविले. छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. फुलांची उधळण, रांगोळीच्या पायघड्या, फटाक्यांची आतिषबाजी आणि हजारो कार्यकर्त्यांचे मोठे शक्ती प्रदर्शन केले.
अजित गव्हाणे म्हणाले, भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार या सर्वांच्या विरोधात परिवर्तनाची लढाई सुरू आहे. आज पदयात्रेच्या निमित्ताने जमलेली गर्दी ही परिवर्तनाची नांदी ठरणार आहे.
भोसरी मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी, शिवसेना (उबाठा) काँग्रेस आणि इतर घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे आदी उपस्थित होते.
भोसरी मतदारसंघांमध्ये परिवर्तनाची लढाई स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सुरू केली. परिवर्तनाच्या या लढाईला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाठबळ दिले. महाविकास आघाडीने अजित गव्हाणे यांना उमेदवारी जाहीर करत एक प्रकारे भोसरीतील भ्रष्टाचार दहशतवाद आणि मनमानी कारभाराला लगाम कसण्यासाठी अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून तगडे आव्हान उभे केले असल्याचे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.
भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने अजित गव्हाणे सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास लांडेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेत त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत अजित गव्हाणे पदयात्रा सुरू केली. यावेळी तुतारीचा निनाद भोसरीच्या आसमंतात भरून गेला. भोसरी गावठाण भैरवनाथ मंदिर, समस्त गव्हाणे तालीम, समस्त फुगे माने तालीम, मारुती मंदिर , व तत्यानंतर भोसरी उड्डाणपूल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेची सांगता करण्यात आली.