आम्ही अपप्रवृत्तींना रोखायला आलोय

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडला पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचाराचा हिशेब
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड महापालिकेत अपप्रवृत्ती बळावल्या आहेत. त्यामुळे अक्षरशः ही महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण झाली आहे. शाळा स्वच्छतेपासून विकास कामांपर्यंत सगळ्या गोष्टीत फक्त टेंडरमध्ये रस घेतला जातो. ही वृती थांबवायला आता आम्ही आहोत. हे गैरप्रकार रोखून पिंपरी-चिंचवडकरांचे प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही करू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चिंचवड येथे दिले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ रहाटणीत सभा झाली. यावेळी पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, गणेश भोंडवे आदी उपस्थित होते.
काय म्हणाले जयंत पाटील?
जयंत पाटील म्हणाले, ‘गेल्या वेळी कलाटे यांना आमदारकीने चकवा दिला, मात्र यावेळी नाही. मागच्या वेळी गल्लत झाली आता कसर भरून काढण्याचे काम करायचे आहे. महागाई खूप वाढली आहे. २१० लाख कोटींचे कर्ज आपल्यावर आहे. कोणतेही प्रकल्प महाराष्ट्रात आले नाहीत. उद्योग गुजरातला पळवून नेण्याचे काम केले जात आहे. २०१६ पासून महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न हे गुजरात पेक्षा कमी आहे. पिंपरीत नदी सुधार, वाहतूक कोंडीतून मुक्तता, भ्रष्ट्राचारमुक्त कारभार करायचा आहे. शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्ट्राचार करणाऱ्यांना सत्ताधाऱ्यांना घरी बसवायचे आहे.’
चिंचवडमध्ये कॉन्ट्रॅक्टरराज
चाबुकस्वार म्हणाले, ‘केंद्र सरकारने देशाची वाट लावली आहे. संविधानाचे चार स्तंभ तोडण्याचे काम सुरु आहे. पक्ष फोडण्याचे काम केले आहे. चिंचवडमध्ये घराणेशाही आणि कॉन्ट्रॅक्टर राज्य आहे.पाच हजारवाले पाच हजार कोटींचे मालक झाले आहेत. चिंचवडमध्ये घराणेशाही आणि कॉन्ट्रॅक्टर राज सुरु आहे. त्यास दूर करून राहुलदादा याना विजयी करा. ‘
रावेत किवळेचा झाला का विकास?
भाजपात गेलेल्या मोरेश्वर भोंडवे यांचे बंधू तुकाराम भोंडवे राहुल कलाटे यांच्या व्यासपीठावर होते, ते म्हणाले, ‘प्रा. मोरे यांच्यानंतर दूरदृष्टी असणारे नेते नाही, हे दुर्दैव. चिंचवड मतदार संघात सांगवीचा जेवढा विकास झाला. तेवढा रावेत किवळेचा झाला का? मतदार संघात कोणाचे भले झाले, हा प्रश्न आहे.’
नागरिकांच्या पैशाची चोरी होतेय
राहुल कलाटे म्हणाले, ‘नागरिकांच्या पैशाची चोरी सुरु आहे. वीस वर्षे सिंगल आमदार होते, आता शेठ उतरले. चारवेळा संघर्ष करणारा मी कार्यकर्ता आहे. मला संधी द्या. हजारो कोटींची टेंडर आणि स्मार्ट सिटीत भ्रष्ट्राचार झाला आहे. कोण म्हणते मतदारसंघात ताकद आहे. ताकद नाही ती सूज आहे.” विलास लांडे म्हणाले, ‘ पिंपरी चिंचवड शहरात भ्रष्ट्राचाराचा महापूर आलेला आहे. रस्ते कागदावर असतात. येथील सत्ताधारी रिंग करण्यात धन्यता मानतात.’