फक्त मुद्द्याचं!

7th September 2025
पिंपरी-चिंचवड

 वायसीएम रुग्णालयात बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम ; राज्य शासनाची मंजूरी!

 वायसीएम रुग्णालयात बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम ; राज्य शासनाची मंजूरी!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वाय.सी.एम) पदव्युत्तर शिक्षण संस्थेअंतर्गत बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम ६० विद्यार्थी क्षमतेसह सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची अधिकृत मंजूरी मिळाली आहे. रुग्णालयाच्या आवारातील नव्याने बांधलेल्या अकरा मजली इमारतीच्या तिसऱ्या, चौथ्या व सहाव्या मजल्यावर ही ‘परिचर्या विज्ञान संस्था’ म्हणजेच ‘इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस’ संस्था सुरू करण्यात येणार आहे.

viara vcc
viara vcc

जानेवारी २०२२ मध्ये बीएस्सी नर्सिंग महाविद्यालय स्थापनेबाबत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यानंतर प्रस्ताव तयार करून तो स्थायी समितीकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावाला १० मार्च २०२२ रोजी स्थायी समिती आणि ६ एप्रिल २०२२ रोजी सर्वसाधारण सभेकडून मान्यता मिळाली. तर पदव्युत्तर संस्था वायसीएम रुग्णालयांतर्गत बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी पदनिर्मिती करण्यास २४ जून २०२४ रोजी राज्याच्या नगरविकास विभागाकडून तत्त्वतः मान्यता देण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयूएचएस), नाशिक यांच्याकडे ५ नोव्हेंबर २०२४ रोजी महाविद्यालय संलग्नतेसाठी अर्ज सादर करण्यात आला. त्यास अनुसरून सक्षमता मूल्यांकन समितीच्या शिफारशीनुसार राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने १६ जुलै २०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून ३० जुलै २०२५ रोजी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रथम संलग्नता (एफटीए) मंजूर करण्यात आला, व पिंपरी चिंचवड महापालिकेला पदव्युत्तर संस्था वायसीएम रुग्णालय येथे बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम ६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.

सीईटी-सेलमार्फत राबवली जाणार प्रवेश प्रक्रिया
वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर शिक्षण संस्था २०१८ मध्ये सुरू झाल्यापासून २४० हून अधिक पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी रुग्णालयाच्या अत्यावश्यक सेवांमध्ये विशेषतः कोविड-१९ काळात मोलाचे योगदान दिले आहे. राज्य शासनाने आता बीएस्सी नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, आरोग्य सेवा प्रणाली व महिला सक्षमीकरणाच्या दिशेने धोरणात्मक गुंतवणूक झाली आहे. या नर्सिंग महाविद्यालयाकरिता प्रवेश प्रक्रिया वैद्यकीय सेवा संचालनालय, मुंबई (सीईटी-सेल) मार्फत राबविली जाणार आहे. बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू केल्याने नर्सिंग मनुष्यबळ आवश्यकता व उपलब्धता यामधील तफावत दूर होण्यास हातभार लागेल. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील उमेदवारांना कमी खर्चात तसेच पात्र उमेदवारांना शासकीय दरात शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

परिचर्या विज्ञान संस्था, वायसीएम रुग्णालय हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या महाविद्यालयामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या शैक्षणिक विकासात भर पडणार आहे. – डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, पदव्युत्तर संस्था, वायसीएम रुग्णालय

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"