पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार

पिंपरी : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील सर्व 39 पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.ऑडिटमध्ये काही बाबी निदर्शनास आल्यास तत्काळ पुतळ्याची दुरूस्ती करावी, असा आदेश शहर अभियंता मकरंद निकम यांनी स्थापत्य विभागाच्या सर्व कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे.
थोर महापुरूषांच्या कार्याची नवीन पिढीला माहिती व्हावी, महापुरूषांनी देशाच्या स्वातंत्र्यांसाठी दिलेल्या त्यागाची, बलिदानाची आणि त्यांचा प्रेरणादायी जाज्वल्य इतिहासाची आठवण अवितरतपणे समाजामध्ये, तरूणांना सदैव रहावी, भावी पिढीने महापुरूषांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या विचारसरणीने आयुष्यात वागावे. त्यांचे विचार आत्मसात करावे, या उद्देशाने शहराच्या प्रवेशव्दारावर, महत्वाच्या चौकात, शासकीय इमारतींमध्ये किंवा इमारतींसमोर महापुरूषांचे पुतळे उभारले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्यासह आदी महापुरूषांचे 39 पुतळे उभारण्यात आले आहेत.
शहरात महापालिकेचे आठ क्षेत्रीय कार्यालय आहेत. या सर्व कार्यालयाअंतर्गत तब्बल 39 पुतळे उभारण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक पुतळे हे ह प्रभाग कार्यालय क्षेत्रात 15, त्यानंतर अ प्रभाग कार्यालय क्षेत्रात 11, ग कार्यालय क्षेत्रात 5 आणि इतर पाच प्रभागात 8 असे 39 पुतळे आहेत.