शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये लोकसेवा हक्क दिनानिमित्त विशेष बैठका व मेळावे !

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभागाच्यावतीने सोमवारी (२८ एप्रिल) सेवा हक्क दिन तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या दशकपूर्तीचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत समाज विकास विभागाच्या वतीने शहरातील झोपडपट्टी व बचत गटांमध्ये समूह संघटकांच्या माध्यमातून विशेष मेळावे व बैठका घेण्यात आल्याची माहिती समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी दिली.
सदर उपक्रमात समाज विकास विभागाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सेवा हक्काबाबत जागरूकता निर्माण होण्यास हातभार लागला आहे.यामध्ये महापालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय कार्यालयांसह इतर कार्यालयांमध्ये सेवा हक्क दिनानिमित्त सेवेची बांधिलकी मानणारी शपथ अधिकारी वर्गांना देण्यात आली.. महापालिकांच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे आरोग्य विभागातील आय ई सी टीममार्फत गर्दीच्या ठिकाणी, पर्यटन स्थळे, तीर्थक्षेत्रे येथे सेवा हक्क नियमांचे फलक घेऊन जनजागृती करण्यात आली. शहरातील विविध नागरी भागांमध्ये पथनाट्याद्वारे सेवा हक्काबाबत जनजागृती करण्यात आली. तर समाज विकास विभागाच्या वतीने झोपडपट्टी व बचत गटांमध्ये समूह संघटकामार्फत सेवा हक्क अधिनियमाची माहिती देण्यासाठी मेळावे व बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बैठकामधून शासनाच्या योजना व त्यांच्या हक्काबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकींमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत नागरिकांना मिळणाऱ्या सेवा, त्यांचे हक्क, तसेच सेवा मिळण्यात अडथळा आल्यास उपलब्ध असलेल्या तक्रार निवारण प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
लोकसेवा हक्क दिनानिमित्त समाज विकास विभागाच्या वतीने झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या सेवा व हक्काबाबत जनजागृती करण्याचा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये लोकशाही हक्काबाबत जागरूकता निर्माण होण्यास हातभार लागला आहे. शेखर सिंह , आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका