भंडारा डोंगर ही तुकोबांची साधना भूमी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
देहू, ता. ६ : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी या पवित्र श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर साधना केली, तप केले. महाराजांची ही साधनाभूमी आहे, तपोभूमी आहे. आत्मस्वरूपाच्या प्राप्ती करिता आपल्या देहाची, प्राणाची आटळी करणे, त्यांना झिजवणे याला तप म्हणतात, प्रतिपादन हभप चैतन्यमहाराज देगलुरकर यांनी बुधवारी येथे केले.
श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट च्या वतीने माघ शुद्ध दशमीनिमित्त किर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे त्यावेळी ते बोलत होते. चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले, दुसरी व्यवस्था या जगाच्या पाठीवर आपल्यासाठी उपलब्ध नाही. म्हणून जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे नित्यनियमाने रोज थोडा वेळ का होईना ज्ञानेश्वरी व गाथा वाचत चला यातच समाधान आहे, जीवनाचे कल्याण आहे, जीवनाची धन्यता आहे. आपल्याला अंत:काळी जर भगवंताचे दर्शन कोणी करून देणारे असेल तर फक्त ज्ञानेश्वरी आणि गाथा आहे हे लक्षात ठेवा .
जगद्गुरू संत तुकोबारायांच्या ‘देह नव्हे मी सरे । उरला उरे विठ्ठल ॥ म्हणऊनि लाहो करा । काळ सारा चिंतनें ॥ पाळणाची नाहीं चिंता । ठाव रिता देवाचा ॥ तुका म्हणे जीवासाठी । देव पोटीं पडेल ॥‘ या उपदेशपर अभंगातून चिंतन करीत उपस्थित श्रोत्यांना सांगितले की, जगद्गुरू संत तुकोबारायांनी त्यांना प्राप्त झालेल्या अनुभवातून आपला काळ चिंतनात घालवावा त्यातच जीवनाचे कल्याण आहे, जीवनाची धन्यता आहे असा उपदेश करतात.
आपल्याला जे मिळेल ते जगाला देणे हीच खरी सदबुद्धी आहे. तुकोबांनी जे काही मिळवलं ते जगाला गाथेच्या रूपेने दिलेले आहे. त्यामुळे माऊलींची ज्ञानेश्वरी , तुकोबारायांची गाथा यातच जीवनाचे कल्याण आहे, जीवनाची धन्यता आहे. तुकोबारायांचे प्राण, शरीर व इंद्रिये या जागेवर झिजली म्हणून या पवित्र अशा भंडारा डोंगराला वारकरी संप्रदायात एक वेगळे असे महत्व आहे, अनुष्ठान आहे. इथला कण आणि कण, इथले वातावरण तुकोबारायांच्या तप सामर्थ्याने प्रभावित झालेले आहे. माणसाच्या परमार्थिक जीवनात साधनेला महत्व आहे. संताच्या परमार्थिक जीवनाची इतिकर्त्यव्यता ही साधनेशिवाय झाली नाही. साधनेचा परिणाम माणसाच्या जीवनावर होतो. त्याने मानवी जीवनाची समृद्धी सिद्ध होते, असे ते म्हणाले.
साधनेचा परिणाम काळावर होतो, साधनेचा परिणाम साध्य प्राप्तीवर होतो आणि साधनेचा परिणाम आपल्या विचार परीपक्वतेवर होतो. परंतु साधना म्हणजे परमार्थ नव्हे तर ज्ञानाची परीसमाप्ती होणे म्हणजे परमार्थ आहे. इंद्रियांना आवळणे, दान धर्म करणे म्हणजे परमार्थ नव्हे तर दान धर्म करणे हे एक परमार्थाचे साधन आहे. विचार दिसायला चांगला आहे तरी तो माणसाला अशांत करतो आणि विकार वाईट आहे म्हणून तो माणसाला अशांत करतो. म्हणून विकार आणि विचार या दोन्ही गोष्टी जिथे संपून जावून ब्रम्ह स्वरूप जे उरते त्याला परमार्थ म्हणतात. देहाच्या संबंधाने निर्माण झालेला मी पणा, अहंकार संपून जे उरेल ते फक्त विठ्ठल स्वरूप असेल.
अहंकार आला की मानवी जीवनाच्या परमार्थाचा नाश करतो. म्हणून अहंकार विरहित, मी पणा विरहित जीवन जगण्यात जीवनाचे कल्याण आहे, जीवनाची धन्यता आहे. आपल्या कृतीची शुद्धता आणि शब्दांची व्यापकता याने साधनेची परिपूर्ती होते. श्री क्षेत्र भंडारा डोंगर ही भूमी असामान्य अशी असून संत तुकोबारायांचा ‘तुकाशेठ ते जगदगुरू’ पदापर्यंतचा प्रवास या भूमीने पाहिला आहे असे देगलूरकर महाराजांनी सांगितले. तुम्ही इतर शंभर ठिकाणी केलेल्या पारायणापेक्षा या तपोभूमीवर, भंडारा डोंगरावर केलेले पारायण हे तुमच्या जीवनाची धन्यता करणारे असेल. कीर्तन प्रसंगाच्या शेवटी जगद्गुरू तुकोबारायांचे जे वैभवशाली मंदिर निर्माणाचे काम सुरु आहे त्या मंदिर निर्माणाच्या कार्याला सढळ हाताने आर्थिक स्वरुपात भरीव असे सहकार्य करा असे आवाहन देगलूरकर महाराजांनी केले.
काकडा आरती, श्री विठ्ठल-रूक्मिणी, संत तुकाराम महाराजांना अभिषेक करून सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात हभप नाना महाराज तावरे यांच्या व्यासपीठ नेतृत्वाने अवीट, रसाळ वाणीतून गाथा पारायण दोन सत्रांत संपन्न झाले. सायंकाळी ४ ते ६ या दरम्यान ‘संत तुकोबांची हृदय स्पंदने एक अनुभूती’ डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचा संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारित चिंतनाचा कार्यक्रम झाला.
Regards,
Silverink Media Pvt Ltd
Netaji Mankar – 9922404919
Mail – silverink2024@gmail.com