पिंपरी चिंचवड पालिका शाळेतील श्रावणी पुढील शिक्षणासाठी निघाली जर्मनीला!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकणारी विद्यार्थिनी श्रावणी टोनगे हिची निवड जर्मनीतील प्रतिष्ठित युनायटेड वर्ल्ड कॉलेज (UWC) संस्थेच्या रॉबर्ट बॉश कॉलेजमध्ये झाली आहे. येत्या २८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात श्रावणीचा प्रवेश निश्चित झाला आहे. १०० टक्के शिष्यवृत्ती मिळवणारी ती महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी आहे.

. दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनी श्रावणी हिने महापालिकेच्या शाळेतील शिक्षक, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवले आहे. श्रावणी आता अकरावी-बारावीच्या शिक्षणासाठी जर्मनीला चालली आहे. तसेच या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात ती विज्ञान, गणित, अर्थशास्त्र यासारख्या विषयांचा सविस्तर अभ्यास करणार आहे. जर्मनीतील प्रतिष्ठित युनायटेड वर्ल्ड कॉलेज (UWC) संस्थेच्या रॉबर्ट बॉश कॉलेजेस या संस्थेमार्फत शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्रातून तिची निवड करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेत तिला ९३ टक्के गुण मिळाले आहेत. तिचे वडील खासगी शाळेत शिक्षक आहेत, तर आईदेखील खासगी कंपनीत नोकरी करत आहे.
शिष्यवृत्तीसाठी विविध टप्प्यांवर परीक्षा, चर्चा, मुलाखत आणि उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. श्रावणीच्या नेतृत्वगुणांना, सामाजिक जाणिवेला आणि शैक्षणिक समतेला या निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले गेले.
श्रावणीची निवड झाल्यामुळे हे संपूर्ण शहरासाठी आणि महापालिकेच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी गौरवाचा क्षण आहे. श्रावणीने आपली गुणवत्ता, जिद्द आणि प्रयत्नांच्या जोरावर हे यश मिळवले आहे. केंद्रित शिक्षणपद्धती आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा मोठा वाटा तिच्या यशात आहे. ‘विद्यार्थी गुणवत्तावाढ उपक्रम’, विशेष मार्गदर्शन सत्रे आणि शाळेतील प्रोत्साहनात्मक वातावरण यामुळेच श्रावणीला आंतरराष्ट्रीय संधी मिळवता आली आहे.
मला महापालिकेच्या शाळेत केवळ शिक्षणच नाही, तर स्वप्न बघण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली. माझ्या यशामध्ये शिक्षकांचे सततचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि शाळेच्या वातावरणाचा मोठा वाटा आहे. युनायटेड वर्ल्ड कॉलेजमध्ये शिकण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी आयुष्य बदलणारं आहे. मी हे यश माझ्या सर्व शिक्षकांना, कुटुंबाला आणि महापालिकेच्या शिक्षण विभागाला समर्पित करते. – श्रावणी टोनगे, विद्यार्थिनी