सावली… बेघरांच्या दुःखाला मायेची सोबत!

पिंपरी चिंचवड महापालिकेचे निवारा केंद्र निराधारांसाठी ठरतंय आधार
पिंपरी : कधी कुणी नात्यांपासून दूर गेलेलं, तर कुणी रस्त्यावर बेवारस अवस्थेत सापडलेलं… काहींना मानसिक-शारीरिक आजारांनी ग्रासलेलं, तर काहींना दोन घास मिळवण्यासाठी रस्तोरस्ती भटकावं लागलेलं… अशा प्रत्येक निराधारासाठी “सावली” हे केवळ निवाऱ्याचं ठिकाण नाही, तर मायेचा एक जिवंत स्पर्श ठरत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या निवारा केंद्राने अशा निराधारांना समाजाच्या प्रवाहात परत आणण्याचं काम हळुवारपणे आणि निःस्वार्थपणे हाती घेतले आहे. रिअल लाइफ रिअल पीपल या संस्थेच्या सहकार्याने चालवण्यात येत असलेल्या या “सावली निवारा केंद्राला” अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. लाभार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधत, त्यांच्या अवस्था समजून घेत त्यांना नव्या उमेदीनं जगण्याची ऊर्जा दिली.

‘सावली’ निवारा केंद्रात सध्या निराधार, बेघर, मानसिकदृष्ट्या आजारी, तसेच रस्त्यावर सापडलेले वंचित पुरुष आणि महिलांना सुरक्षित निवारा, अन्न, औषधोपचार आणि सल्लामसलत सेवा मोफत दिली जाते. या केंद्रात सध्या विविध वयोगटातील लाभार्थ्यांचा निवास आहे. काहींच्या डोळ्यात अजूनही काळजी आहे, पण तितकीच असते इथल्या माणसांच्या आपुलकीची जाणीव. या केंद्रातील कर्मचारी केवळ सेवा नाही, तर प्रेमाची आणि समजूतदारपणाची ऊबही देतात. या निवारा केंद्राला अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी भेट दिली.
“तुम्हाला केंद्रामध्ये कसे वाटत आहे? येथील जेवण कसे आहे? तुम्ही येथे कसे पोहोचलात?” अशी आपुलकीने जांभळे पाटील यांनी लाभार्थ्यांची विचारपूस केली. यावेळी लाभार्थ्यांनी केंद्रामध्ये उत्तम सोयीसुविधा मिळत असल्याचे सांगत त्याबद्दल पिंपरी चिंचवड महापालिका व रिअल लाइफ रिअल पीपल संस्थेचे आभार मानले. “आम्हाला येथे काही अडचण नाही. हे केंद्र म्हणजे आमचा परिवार आहे. येथे आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा सर्व काही मिळाले आहे. आम्ही येथे आनंदात आहोत. येथे आमची खूप काळजी घेतली जाते,” अशा भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी जांभळे पाटील म्हणाले की, “सावली केंद्रामध्ये तुम्हाला आणखी काही सोयीसुविधा लागल्या तर नक्की सांगा. मला तुमचा मुलगा समजून हक्काने काहीही लागले तरी हाक द्या.”
केंद्राला आवश्यक ते मदत करण्याचे दिले निर्देश
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सावली केंद्राची पाहणी करून तेथे दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांची माहिती घेतली . याप्रसंगी केंद्रांत येण्यासाठी रॅम्पची व्यवस्था, लाभार्थ्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी गाडीची व्यवस्था, विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर बॅटरी बॅकअपची व्यवस्था करण्याबाबत तातडीने निर्देश महापालिकेच्या संबंधित विभागांना जांभळे पाटील यांनी दिले. केंद्रातील लाभार्थ्यांना जास्तीतजास्त शासकीय योजनांचा लाभ द्या, ज्या लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल तर ते काढण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा, केंद्रामध्ये जास्तीतजास्त सोयीसुविधा द्या, असे निर्देशही त्यांनी दिले. शहानवाज, काळजीवाहक अमोल भाट, लक्ष्मी वाईकर, विष्णू गायकवाड, कुक उमा भंडारी, लक्ष्मी कांबळे यासर्वांच्या कामाचे कौतुक करून त्यांचा सन्मान केला.
नागरी बेघरांसाठी निवाऱ्यांच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी राज्य शासनाने गठीत केलेल्या निवारा सनियंत्रण समितीच्या निर्देशानुसार त्रिशरण एनलायनमेंट फाउंडेशनने विविध निवाऱ्यांचे परीक्षण करून अहवाल सादर केला. या अहवालात सावली बेघर निवारा केंद्र हे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोत्तम निवाऱ्यांपैकी ‘प्रथम क्रमांकावर’ असल्याचे घोषित करण्यात आले आहे. आज पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि उपायुक्त ममता शिंदे यांनी या केंद्राला भेट दिली असून ही भेट आमच्या संस्थेतील निराधार आई-वडिलांसाठी आश्वासक ठरली असून यातून आम्हाला अधिक जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे. – एम. ए. हुसैन, संस्थापक अध्यक्ष, रिअल लाइफ रिअल पीपल

