संत श्री मुक्ताईंचे ताटीचे अभंग दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक : डॉ. नारायण महाराज जाधव

पिंपरी : संत श्री मुक्ताईंचे ताटीचे अभंग व चरित्र आणि सूत्रसंचालनाचे अंतरंग (दुसरी आवृत्ती) या दोन पुस्तकांचे प्रकाशन भोसरी येथे अंकुशराव लांडगे नाट्यगृहात , शांतीब्रह्म ह.भ. प. मारुती महाराज कुरेकर, वेदांताचार्य ह. भ.प.डॉ. नारायण महाराज जाधव आणि जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते पार पडले.

डॉक्टर नारायण महाराज जाधव यांनी दोन्ही पुस्तकांचे कौतुक करताना हे दोन्ही ग्रंथ साहित्य विश्वामध्ये दीपस्तंभ प्रमाणे आहेत असे गौरवोद्गार काढले.
शांतीब्रह्म कुरेकर बाबांनी या ग्रंथांना आशीर्वाद दिले तसेच या ग्रंथांची इंग्रजी आवृत्ती यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
म.सा.प. पुणे च्या प्रमुख कार्यवाह सुनिता राजे पवार म्हणाल्या की माऊलींच्या काळात खऱ्या अर्थाने सांस्कृतिक लोकशाही होती.
वारकरी शिक्षण संस्थेचे सचिव ह. भ. प. बाजीराव नाना चंदिले महाराज व अध्यापक ह.भ. प. उल्हास महाराज सूर्यवंशी तसेच गायनाचार्य महेश महाराज भगुरे गुरुजी, लायन्स क्लबचे प्रांतपाल ला. राजेश अगरवाल , संत तुकाराम महाराजांच्या वेषात सुदाम भोरे व्यासपीठावर उपस्थित होते.
भजन सम्राज्ञी मीराताई काटमोरे , पिंपरी चिंचवड आणि पुणे आयडॉल भार्गव जाधव आणि महेश महाराज भगुरे गुरुजी यांच्या ताटीच्या अभंग गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ दिंडीने झाली. भोसरी येथील श्रीराम विद्या मंदिर च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी ग्रंथदिंडी काढली. दिंडीमध्ये मान्यवरांनी फुगड्या खेळल्या.
ताटी उघडा ज्ञानेश्वरा या नाटिकेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या ताटीकेत अभिनय केलेल्या लहान मुलांनी उपस्थितांची मने जिंकली. ह.भ.प..सुभाष महाराज गेठे यांची ताटीच्या अभंगावरील प्रवचने ह. भ. प. दिगंबर महाराज ढोकले यांनी संपादित करून श्री संत मुक्ताईंचे ताटीचे अभंग व चरित्र असे पुस्तक तयार केले. त्याचबरोबर प्राध्यापक दिगंबर ढोकले लिखित सूत्रसंचालनाचे अंतरंग आवृत्ती दुसरी प्रकाशित झाले.
सुभाष महाराज गेठे यांनी संत मुक्ताई यांचे मोठेपण सांगून त्यांचे संत मांदियाळी मधील महत्त्व अधोरेखित केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा लायन्स क्लब भोजापूर गोल्ड, प्रवचन ग्रुप भोसरी,आणि जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठान आळंदी या संस्थांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
वसंत नाना लोंढे अशोक पगारिया, करंदीचे प्रवीण राजाभाऊ ढोकले, अरुण बोऱ्हाडे, शिवलिंग ढवळेश्वर, सागर गवळी, पंडित गवळी, राहुल गवळी, सतीश गोरडे तसेच पिंपरी चिंचवड मधील अनेक साहित्य आणि अध्यात्म प्रेमी बहुसंख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते
म.सा.प. भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे यांनी सर्वांचे स्वागत केले. डॉक्टर रोहिदास आल्हाट यांनी प्रास्ताविक केले. प्राध्यापक दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले मुकुंद आवटे यांनी आभार मानले.

