संत विचार वैश्विक स्तरावर नेण्यासाठी संतपीठ उपयुक्त ठरेल : देवेंद्र फडणवीस

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीचे समुहशिल्प व संतसृष्टीचे लोकार्पण
संतपीठातील प्रेक्षागृह आणि कलादालनासह विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण
पिंपरी : आपल्या संतांचा विचार हा वैश्विक विचार आहे. जगाला साद घालणारा व दिशा देणारा हा विचार आहे. हा विचार वैश्विक स्तरावर नेण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने उभारलेले जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ उपयुक्त ठरेल. संस्कृतीतील मूलतत्व कायम ठेऊन संत साहित्याची आधुनिक पद्धतीने मांडणी येथे केली जात आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पुणे-आळंदी पालखी मार्गावर वडमुखवाडी येथे उभारण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समुहशिल्प व संतसृष्टीचे लोकार्पण, संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालनाचे उदघाटन केल्यानंतर चिखली येथील टाऊन हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात शहरातील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन आणि उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, संत साहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे, माजी आमदार अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेने सुंदर संतपीठ तयार केले आहे. येथे विद्यार्थ्यांना सीबीएसई अभ्यासक्रमासोबतच संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी या चारही भाषांमध्ये संत साहित्याचे ज्ञान दिले जात आहे. आपल्या संतांचा विचार हा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांकडून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिला जात आहे. पण संतपीठाच्या माध्यमातून हा विचार वैश्विक स्तरावर नक्कीच जाईल. त्यामुळे आगामी काळात संतपीठाच्या विस्तारासाठी राज्य सरकार नेहमीच पाठीशी राहील, असेही श्री फडणवीस म्हणाले.

चऱ्होली येथील नगर रचना योजना रद्द करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी जाहीर केले. यावेळी ते म्हणाले, आपल्याला जे करायचे आहे ते जनतेला विश्वासात घेऊन करायचे आहे. शेवटी आपली महानगरवपालिका ही सुनियोजनबद्ध असायला हवी हे सरकारला वाटते तसे जनतेलाही वाटते. त्यामुळे कुठलेही प्लॅनिंग करताना नागरिकांना विश्वासात घेऊन, त्यांना समजावून सांगून शहराचा उत्तम प्लॅन झाला पाहिजे.
आमदार महेश लांडगे म्हणाले, पिंपरी चिंचवडला संतपीठ उभे राहिल्याचा सर्वांना अभिमान वाटत आहे. या संतपीठाच्या उभारणीसाठी अनेकांनी परिश्रम घेतले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. यासाठी राज्य सरकारनेही सहकार्य केले व संतपीठाच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध करून दिली. संतपीठाप्रमाणेच महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले दिव्यांग भवन देखील दिव्यांग बांधवासाठी उत्तम प्रकल्प ठरत आहे. त्याद्वारे दिव्यांगांना विविध थेरपीज, सोयीसुविधा देण्यात येत आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिकेच्या भूमिपूजन, लोकार्पण आणि उद्घाटन होणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले, पिंपरी चिंचवड नगरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी असून देहू आणि आळंदीच्या कुशीत वसलेले शहर आहे. अत्यंत झपाट्याने विकसित झालेल्या या नगरीने गाव ते महानगर आणि महानगर ते स्मार्ट शहर, असा नावलौकिक अवघ्या काही वर्षांमध्ये मिळविला आहे.
टाळगाव चिखली या परिसरात जगद्गुरू संत तुकोबाराय यांच्या नावाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने संतपीठ सुरू केले आहे. अवघ्या काही वर्षातच या संतपीठाने आपला नावलौकिक प्राप्त केला आहे. संतांची आणि महंतांची जी परंपरा आहे ती परंपरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी आणि ज्ञानाचा हा जो झरा आहे, तो पुढच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रयत्नशील आहे. आज या संतपीठात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, आणि त्यातून अध्यात्म आणि आधुनिकतेची कास अशा दोन्हीचा मिलाप याठिकाणी होतोय.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ॲप चे लोकार्पण
पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी विकसित करण्यात आलेल्या जेष्ठानुबंध या ॲपचा तसेच ट्राफिक बडी व्हॅाट्सअप प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते झाले. याबाबत पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आपल्या मनोगतामध्ये माहिती दिली. ते म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांसाठी २४ तास मदतीसाठी हे ॲप उपलब्ध आहे. या ॲपवर ज्येष्ठांसाठी विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय ट्राफिक बडी व्हॅाट्सअप प्रणाली ही वाहतूक समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी आपुलकी, विश्वास निर्माण करणाऱ्या या दोन्ही प्रणाली आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरजा आपटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मानले.