“स्वातंत्र्य समता,बंधुता आणि न्याय” ही मूल्ये रुजविण्यासाठी संविधानाची भुमिका महत्वपूर्ण : चंद्रकांत इंदलकर

पिंपरी : सर्वच क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या भारतीयांमध्ये स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि न्याय ही मूल्ये रुजविण्यासाठी भारतीय संविधानाची भुमिका महत्वपूर्ण राहिली असून गेल्या ७५ वर्षात जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशाने संविधानाच्या मार्गाने वाटचाल करीत विविध यशाची शिखरे गाठली असून भारतीय संविधानाचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधान दिनाची उत्साहात सुरूवात करण्यात आली. त्यानंतर भीमसृष्टी, पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील मैदानावर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटनही अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते कार्यक्रम स्थळी असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान पिंपरी येथील भीमसृष्टी येथील भारतीय संविधान फलकास देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थितांनी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या समवेत “आम्ही,भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी,धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर,१९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत” अशा आशयाच्या संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
अभिवादनाच्या वेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अभयचंद्र दादेवार, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अभियंता चंद्रकांत कुंभार, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम, जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे, किसन केंगले, अभिजित डोळस, विकास गायकांबळे, तुकाराम गायकवाड,ओंकार पवार, पियुष घसिंग, श्रेयश जाधव, सचिन महाजन यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.