रोहित शर्मा,हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री, अभिनेते धर्मेंद्र, शिबू सोरेन, पियुष पांडे याना मरणोत्तर पद्यविभूषण!

महाराष्ट्रातील चार जणांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आले
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च पुरस्कार मानले जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील चार जणांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

यामध्ये लोकनाट्य क्षेत्रात तमाशा कलाकार रघुवीर खेडकर, कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना यंदाच्या वर्षीचे पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. याशिवाय पालघर मधील वारली संगीतकार विकल्या लाडक्या ढिंका आणि अमिंदा फर्नांडिस यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. प्रजासत्ताकाच्या पूर्वसंध्येला सर्व सन्मानितांची नावे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. यामध्ये 131 मान्यवरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील चार भूमिपुत्रांना पद्मश्री पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेत्या रघुवीर खेडकर, भिकल्या लडक्या धिंडा, श्रीरंग देवबा लाड, अरविंद फर्नांडिस यांचा पद्म पुरस्काराने सन्मान होणार आहे.
अभिनेते धर्मेंद्र यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील गौरवाबद्दल पद्य विभूषण या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. धर्मेंद्र यांना हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबाबत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शिबू सोरेन यांना राजकीय क्षेत्रातील योगदानासाठी मरणोत्तर पद्य विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जाहिरात लेखक पियुष पांडे यांनाही मरणोत्तर पद्य भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर महाराष्ट्राचे वादग्रस्त माजी राज्यपाल भगतसिंग कोषारी यांना देखील पद्य विभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. अलका याज्ञिक यांना देखील पद्यभूषण पुरस्कार दिला जाणार आहे.
वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा कप्तान रोहित शर्मा आणि महिला क्रिकेट संघाची कप्तान हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2024 मध्ये t20 विश्वचषक पटकावला तर 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी वर नाव कोरले .महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही भारताच्या महिला संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप जिंकून देणारी पहिली कर्णधार ठरली. याशिवाय यशस्वी टेनिसपटू विजय अमृतराज यांना पद्मभूषणने गौरविण्यात आले आहे. सरकारने यावर्षी 131 व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रीडा क्षेत्रासाठी एक पद्मभूषण आणि आठ पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

