अखेर आचरेकर सरांचे शिल्प साकारणार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : नामवंत क्रिकेट प्रशिक्षक कै. रमाकांत आचरेकर यांच्या गौरवार्थ शिवाजी पार्कच्या पाच क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांचे स्मृतीशिल्प उभारण्यास राज्य सरकारने अध्यादेशाद्वारे मंजुरी दिली आहे. आचरेकर यांच्या आठवणी जपण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात स्मारक असावे, अशी सूचना काही महिन्यांपूर्वी कामत मेमोरियल क्लबचे माजी कर्णधार सुनील रामचंद्रन यांनी केली होती.
रमाकांत आचरेकर यांच्या जन्मदिनी म्हणजे ३ डिसेंबर रोजी या स्मृतीशिल्पाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्क जिमखान्याचे सचिव रामचंद्रन म्हणाले की, या कार्यक्रमास अर्थातच सचिन तेंडुलकर प्रमुख पाहुणा असेल. आचरेकर यांचे २ जानेवारी २०१९ या दिवशी निधन झाले. त्यानंतर सुमारे सहा वर्षांनी हे स्मृतीशिल्प साकारले जाणार आहे. द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या आचरेकर यांनी घडवलेले रामनाथ पारकर, बलविंदर संधू, लालचंद राजपूत, चंद्रकांत पंडित, प्रवीण अमरे, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, समीर दिघे, संजय बांगर, पारस म्हाम्ब्रे, रमेश पोवार आणि अजित आगरकर यांची भारतीय संघात निवड झाली आहे.
कसे असेल स्मृतिशिल्प?
रमाकांत आचरेकर यांच्या या स्मृतिशिल्पात चेंडू, बॅट, हेल्मेट, ग्लोव्हज आणि पॅड असतील. त्यातील बॅटवर आचरेकर यांनी घडवलेल्या १२ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या स्वाक्षरी असतील. हे स्मृतिचित्र सहा फूट लांब, सहा फूट रुंद आणि सहा फूट उंच असेल. या स्मृतीशिल्पाची उभारणी ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची असेल. त्यासाठी सर्व परवानग्या वेळेत पूर्ण करण्यासही सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर या स्मृतिशिल्पाच्या दुरुस्तीची जबाबदारीही कामत क्लबची असेल. स्मृतिशिल्प उभारताना एकही झाड कापले जाणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घेतली जाणार आहे.