Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
पिंपरी-चिंचवड

पहिल्या तिमाहीतच विक्रमी ५२६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा!

पहिल्या तिमाहीतच विक्रमी ५२६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा!

४ लाख ४५ हजार ६२० मालमत्ताधारकांनी घेतला कर सवलतींचा लाभ
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये कर वसुलीचा उच्चांकी ‘माईलस्टोन’ गाठला आहे. अवघ्या तीन महिन्यांत ५२६ कोटी १४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात विभागाला यश आले आहे. ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता धारकांपैकी पहिल्या तिमाहीमध्येच ५९.८४ टक्के मालमत्ता धारकांनी कराचा भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. याबद्दल सर्व करदात्यांचे महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी आभार मानले आहेत.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड शहरात सध्या निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व इतर मिळून सुमारे ७ लाख ४४ हजार ६३० मालमत्तांची नोंद असून त्यापैकी ४ लाख ४५ हजार ६२० मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. पहिल्या तिमाहित कर भरणा-या नागरिकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. नागरिकांनी मालमत्ताकर भरण्यासाठी करसंकलन विभागाने विविध उपाययोजना राबविल्या. त्याच्या माध्यमातून करदात्यांपर्यंत मालमत्ताकरावरील सवलतीबाबत विविध प्रकारे जनजागृती करण्यात आली. यामुळे नागरिकांना सवलतीबाबत माहिती होऊन नागरिकांनी पहिल्या तिमाहीमध्येच आपला मालमत्ताकर भरण्यासाठी प्राधान्य दिले आहे.

सवलतीबाबत जनजागृती झाल्याने परिणामी, सन २०२६-२७ या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण मालमत्ताधारकांपैकी ४ लाख ४५ हजार ६२० मालमत्ताधारकांनी कर भरला असून त्यापैकी ३ लाख ४७ हजार ५६४ मालमत्ता धारकांनी ऑनलाइन स्वरूपात कर भरून सवलतींचा लाभ घेतला आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही पालिकेने राबविलेल्या महिला बचत गटामार्फत मालमत्ताधारकांना घरपाेच बिलाचे वाटप केले, त्यामुळे नागरिकांनी ३० जूनपर्यंत महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक कराचा भरणा केल्याची माहिती उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.

असा आला मालमत्ता कर
ऑनलाइन – ४०७ कोटी ८९ लाख, रोख – २१ कोटी ४७ लाख , धनादेशाद्वारे – १६ कोटी २४ लाख ,डीडी – १५ कोटी ७५ लाख , विविध अँप- १० कोटी ४५ लाख
कर भरणाऱ्या मालमत्तांची आकडेवारी
निवासी- ३ लाख ८२ हजार ५२२ ,बिगरनिवासी – ३३ हजार ७९३ ,मिश्र- ८ हजार ६२३,औद्योगिक – ३ हजार ७५, मोकळ्या जमीन – २ हजार ५९१ इतर – १३

वाकड झोनमधून उच्चांकी कर वसूल
शहरात कर संकलनासाठी महापालिकेचे १८ झोन आहेत. यामध्ये वाकड विभागीय कार्यालयांतर्गत सर्वात जास्त वसुली झाली आहे. वाकडमध्ये ७२ कोटी ८७ लाख, थेरगाव ४६ कोटी ७१ लाख, कस्पटे वस्ती ३९ कोटी ३३ लाख, चिखली कार्यालयाने ३७ कोटी ९५ लाख, किवळे ३८ कोटी ३७ लाख, चिंचवड ३४ कोटी ४७ लाख, भोसरी ३४ कोटी ७३ लाख, मोशी ३१ कोटी २२ लाख, पिंपरी वाघेरे ३२ कोटी ५३ लाख, सांगवी २६ कोटी, मनपा भवन २८ कोटी ७५ लाख, आकुर्डी २३ कोटी ९० लाख, च-होली १७ कोटी ८२ लाख, फुगेवाडी २० कोटी ९७ लाख, दिघी-बोपखेल ११ कोटी ८८ लाख, तळवडे ११ कोटी २३ लाख, निगडी प्राधिकरण १३ कोटी २५ लाख, पिंपरीनगर ३ कोटी ९९ लाख असा कर वसुल झाला आहे.

पहिल्या तिमाहीत कर वसुलीचा वाढता आलेख
२०२१-२२ : १७१ कोटी, २०२२-२३ : २५५ कोटी,२०२३ – २४ : ४५४कोटी ,२०२४-२५ : ४४० कोटी ,२०२५- २६ :५२४ कोटी ,२०२६-२७ ः ५२६ कोटी

मालमत्ताकरावरील सवलतींची माहिती व मालमत्ताकराचे बिले वेळेवर पोहोचल्याने नागरिकांनी यावर्षीही पहिल्या तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणात कराचा भरणा केला आहे. नावीन्यपूर्ण कल्पना व उपक्रमांच्या सांघिक कामगिरीमुळे करसंकलनामध्ये आम्ही सातत्य राखून नागरिकांना पहिल्या तिमाहीमध्ये कर भरण्यासाठी प्रवृत्त करू शकलो आहोत. त्यामुळेच ५२६ कोटींचा टप्पा गाठण्यात आम्ही यशस्वी झाला.- तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

पहिल्या तिमाहीतच जास्तीत जास्त कर वसुल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार सुक्ष्म नियोजन केले, वेळोवेळी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आढावा घेतला. त्यामुळेच ५२६ कोटींचा कर वसुल करण्यात यश आले. विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सांघिक कामगिरीमुळे हे शक्य झाले. मोठ्या थकबाकीदारांना यापूर्वीच जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. अशा मोठ्या आणि व्यावसायिक थकबाकीदारांकडे यापुढील काळात लक्ष केंद्रित करण्यात येणार असून जप्ती माेहित सुरू केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली मालमत्ता जप्त हाेऊ नये, यासाठी तात्काळ कराचा भरणा करावा. – सचिन पवार, उपायुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"