फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पिंपरी-चिंचवड

महापालिकेच्या वतीने पर्जन्यमान व पूर अंदाज ; पुर्वसूचना प्रणाली” कार्यान्वित!

महापालिकेच्या वतीने पर्जन्यमान व पूर अंदाज ; पुर्वसूचना प्रणाली” कार्यान्वित!

शहर सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग (C-DAC), पुणे यांच्या सहकार्याने प्रगत “पर्जन्यमान व पूर अंदाज – पुर्वसूचना प्रणाली (अर्ली डिटेक्शन सिस्टीम)” कार्यान्वित करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश हवामान, वायू गुणवत्ता आणि पूर यांचे अचूक भाकीत करून आपत्ती व्यवस्थापन आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत गती आणून प्रभावी उपाययोजना राबविणे हा आहे.

ही प्रणाली भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन (NSM) अंतर्गत विकसित करण्यात आली आहे. या योजनेचा भाग म्हणून, C-DAC पुणे येथील उच्च कार्यक्षमता संगणन (HPC) गटाने भारतीय शहरांसाठी शहरांमध्ये निर्माण होणाऱ्या विविध पर्यावरणीय समस्यांचा ( पावसाचे प्रमाण, पूर, वायू प्रदूषण, उष्णतेच्या लाटा) अभ्यास करून त्यांचे संगणकीय मॉडेल तयार केले आहे. या संदर्भात, मल्टि-सेक्टोरियल सिम्युलेशन लॅबची उभारणी केली गेली असून हवामान, जलव्यवस्थापन, आरोग्य, वाहतूक इत्यादी विविध क्षेत्रांमधील घटक एकत्रितपणे समाविष्ट केले गेले आहेत आणि आभासी प्रयोगांद्वारे त्यांच्या परिणामांवर अभ्यास केला जात आहे.

त्याचबरोबर, प्रयोगशाळेच्या मदतीने एक विज्ञानाधिष्ठित निर्णय सहाय्यक आराखडा विकसित केला जात असून यामुळे शहर प्रशासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मदत होणार आहे. या पद्धतीच्या माध्यमातून पाऊस, पूर, वायू प्रदूषण यांसारख्या शहरी पर्यावरणीय समस्या ओळखता येतात आणि त्यावर वेळेवर उपाययोजना आखता येतात, ज्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे हाताळता येते.

viarasmall
viarasmall

प्रणालीची ठळक वैशिष्ट्ये
•उच्च कार्यक्षम संगणनावर आधारित जोडलेली आणि एकात्मिक प्रणाली
शहर वॉर्ड, गाव आणि तहसील स्तरावर हवामान, जलविज्ञान आणि वायू गुणवत्ता यांचे उच्च रिझोल्यूशन मॉडेलिंग करण्यात आले आहे. या प्रणालीच्या माध्यमातून ७२ तासांपूर्वीच पाऊस, उष्णतेची लाट/थंडीची लाट, पूर, एकात्मिक जलाशय व्यवस्थापन आणि वायू प्रदूषण यांचे अचूक भाकीत केले जाते.
•स्वयंचलित पडताळणी व मूल्यांकन प्रणाली
हवामान आणि पूर यासंबंधीच्या मॉडेल्सच्या भाकितांची अचूकता तपासण्यासाठी प्रत्यक्ष निरीक्षण केलेल्या आकडेवारीशी तुलना करणारी स्वयंचलित प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
•एंड टू एंड वेब GIS आधारित निर्णय सहाय्यक प्रणाली (DSS)
विविध क्षेत्रांसाठी अलर्ट्स, डेटा विश्लेषण, GIS आधारित दृश्यांकन (visualization) आणि परस्परसंवादी माहिती यांचे सुलभ माध्यम तयार करण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे धोरणकर्ते आणि नागरिकांना हवामान व पूर संदर्भातील माहिती सहज उपलब्ध होते.
•स्थानिक पातळीवर त्वरित निर्णयासाठी मदत
ही प्रणाली शहर आणि गाव पातळीवर प्राप्त होणाऱ्या निरीक्षणे व अंदाजित डेटाच्या आधारे आपत्ती व्यवस्थापन व निवारणासाठी प्रशासनाला वेळीच आणि योग्य निर्णय घेण्यास सहाय्य करते.
या प्रणालीच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड क्षेत्रातील नागरिकांना हवामानाच्या आपत्कालीन स्थितीबाबत वेळीच माहिती मिळणार असून आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम व परिणामकारक होणार आहे.

आपत्तीपूर्व तयारी ही सुरक्षित शहराच्या बांधणीसाठी अत्यावश्यक आहे. C-DAC च्या सहकार्याने विकसित केलेली प्रगत हवामान व पूर पूर्वसूचना प्रणाली पिंपरी चिंचवड शहराला अधिक सक्षम, जागरूक आणि आपत्ती निवारणास सज्ज बनवेल. या प्रणालीच्या मदतीने धोरणनिर्मितीपासून नागरिकांच्या सुरक्षेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर परिणामकारक निर्णय घेता येणार आहेत. – शेखर सिंह, आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"