फक्त मुद्द्याचं!

8th April 2026
पिंपरी-चिंचवड

“लोकसहभाग हीच शहर विकासाची ताकद”: महापौर रवि लांडगे

“लोकसहभाग हीच शहर विकासाची ताकद”: महापौर रवि लांडगे

झाडे लावून पर्यावरणाचे रक्षण करण्याची नागरिकांनी घेतली शपथ…
पिंपरी : “लोकसहभागातून उभे राहणारे उपक्रम हीच शहर विकासाची खरी ताकद आहे, निगडी परिसरातील नागरिक आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार झालेला ऑक्सिजन पार्क हा एक अनोखा आदर्श असा पर्यावरणपूरक उपक्रम आहे असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी निगडी प्राधिकरण येथील ऑक्सिजन पार्कच्या उद्घाटन प्रसंगी केले.

viara vcc
viara vcc

निगडी प्राधिकरण येथील सेक्टर २६ मध्ये स्थानिक रहिवासी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या सहभागातून विकसित करण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले,त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास आमदार अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसदस्या शैलजा मोरे, अनुराधा गोरखे, नगरसदस्य अमित गावडे यांच्यासह महापालिका मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, कार्यकारी अभियंता सुनील पवार, दिलीप भोसले, जयकुमार गुजर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तसेच राजेंद्र बाबर, विजय नाईक, धनंजय शेडबाळे,सुर्यकांत मुथियान व ऑक्सिजन पार्क उभारण्यात सक्रिय सहभाग नोंदविणारे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले की, पर्यावरण संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असून अशा हरित प्रकल्पांमुळे पिंपरी चिंचवड शहर हे अधिक आरोग्यदायी आणि सुंदर बनेल. तसेच शहरातील २०३ उद्यानांपैकी २५ ते ३० उद्यानांमध्ये अशी संकल्पना लोकसहभागातून राबविण्यात येईल, असेही त्यांनी बोलताना सांगितले.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच ‘माझी वसुंधरा’ शपथ घेऊन पर्यावरण संवर्धनाचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

माझी वसुंधरा शपथ
“आम्ही भारताचे सुजाण नागरिक म्हणून शपथ घेतो की,आम्ही भारतमातेला आणि या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करू, या वसुंधरेला आणि पर्यावरणाला आमच्याकडून कोणतीही हानी होणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ. आम्ही या देशाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी कटिबद्ध राहू आणि आमच्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम आम्ही करणार नाही. जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला आणि वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करू, अशी शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली. शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर हरित क्षेत्रांचे जतन व संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांच्या सहभागातून साकारलेला हा प्रकल्प पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल आणि हरित शहराच्या संकल्पनेला बळ देईल. — डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"