फक्त मुद्द्याचं!

20th March 2026
पिंपरी-चिंचवड

वापरात नसलेल्या वस्तू जवळच्या आर.आर.आर. केंद्रात जमा करून पुनर्वापराला चालना द्या!

वापरात नसलेल्या वस्तू जवळच्या आर.आर.आर. केंद्रात जमा करून पुनर्वापराला चालना द्या!

स्वच्छ, हरित शहरासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे नागरिकांना आवाहन
पिंपरी : प्रत्येक घरात वेळोवेळी साफसफाई करताना जुनी खेळणी, कपडे, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर अशा अनेक वस्तू बाहेर टाकल्या जातात. या वस्तू रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याने शहराचे सौंदर्य बाधित होते आणि कचऱ्याचे प्रमाण वाढते. मात्र, या वस्तू योग्य पद्धतीने संकलित करून गरजूंपर्यंत पोहोचवल्यास पुनर्वापर होऊन समाजालाही मदत होते.

vcc gudhi padva
vcc gudhi padva

सामाजिक बांधिलकी जपत पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील विविध प्रभाग स्तरावर आर.आर.आर. (रिड्यूस, रियुज, रिसायकल) केंद्रे सुरू केली आहेत. तरी नागरिकांनी घरातील वापरात नसलेल्या पण सुस्थितीत असलेल्या वस्तू आर.आर.आर. केंद्रात जमा कराव्यात, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी महापौर रवि लांडगे, उप महापौर शर्मिला बाबर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागाकडून शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत विविध ठिकाणी आर.आर.आर. केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये नागरिकांनी घरातील न वापरता ठेवलेल्या पण चांगल्या स्थितीतील वस्तू जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जमा झालेल्या वस्तूंचा गरजूंपर्यंत पुनर्वितरण केले जाते. त्यामुळे शहर स्वच्छ राहते, कचऱ्याचे प्रमाण घटते आणि समाजात पुनर्वापराची जाणीव वाढते.

या उपक्रमामुळे वापरात नसलेल्या वस्तूंचा योग्य पुनर्वापर आणि पुनर्निर्मितीद्वारे पर्यावरणावर होणारा ताणही घटतो. नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधला जात आहे.

या ठिकाणी आहेत आर.आर.आर केंद्र
“अ” क्षेत्रीय कार्यालय : कापसे उद्यान, मोरवाडी (प्र. १०), आकुर्डी भाजी मंडई (प्र. १४), संत तुकाराम महाराज गार्डन (प्र. १५), श्रीधरनगर गार्डन (प्र. १९)
“ब” क्षेत्रीय कार्यालय : एसकेएफ कंपनी शेजारी, थेरगाव (प्र. १७), हेगडेवार पूल, दर्शननगरी (प्र. १८), धर्मराज चौक, रावेत (प्र. १६), ज्योतिबा उद्यान, काळेवाडी (प्र. २२)
“क” क्षेत्रीय कार्यालय : हेगडेवार क्रीडा संकुल, अजमेरा (प्र. ९), धावडे वस्ती, भोसरी (प्र. ६), संत सावता महाराज उद्यान, मोशी (प्र. २), संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, पिंपळे गुरव (प्र. ८)
“ड” क्षेत्रीय कार्यालय :लिनियर गार्डन, कोकणे चौक (प्र. २८), ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान, पिंपळे निलख (प्र. २६), तानाजी कलाटे उद्यान, वाकड (प्र. २५), प्रभाग कार्यालय क्र. २९
“इ” क्षेत्रीय कार्यालय : मोशी चौक (प्र. ३), दिघी जकात नाका (प्र. ४), राजमाता जिजाऊ उड्डाण पूल, भोसरी (प्र. ५, ७)
“फ” क्षेत्रीय कार्यालय : वृंदावन, चिखली (प्र. १), भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान (प्र. ११), रूपीनगर पोलिस चौकी (प्र. १२), शनि मंदिर, सेक्टर २१ (प्र. १३)
“ग” क्षेत्रीय कार्यालय : थेरगाव हॉस्पिटल शेजारी, जगताप नगर (प्र. २३), मोरू बारणे उद्यान, थेरगाव (प्र. २४), पिंपरीगाव बसस्टॉप (प्र. २१), आरोग्य कोठी, रहाटणी गावठाण (प्र. २७)
“ह” क्षेत्रीय कार्यालय : छत्रपती शिवाजी महाराज गोल मंडई, संत तुकाराम नगर (प्र. २०), सितांगण गार्डन (प्र. ३०), कै. काळुराम जगताप तलाव (प्र. ३१), जुनी सांगवी भाजी मंडई (प्र. ३२).

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"