‘एचएमपीव्ही’चा संभाव्य प्रादुर्भाव !

आमदार महेश लांडगे यांनी घेतली महापालिका भवनात आढावा बैठक
पिंपरी :- राज्यात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या साथरोगाचा धोका वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका सतर्क झाली आहे. शहरातील सर्दी खोकल्याच्या रुग्णांचे आता ‘सर्वेक्षण’ करण्यात येणार आहे. याबाबत महापालिका प्रशासन अधिकारी तथा आयुक्त शेखर सिंह यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.
ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) च्या संभाव्य धोक्याबाबत सतर्कता आणि खबरदारीच्या निमित्ताने भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका भवन येथे आयुक्त शेखर सिंह आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मकरंद निकम, पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले आदी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, शहरात संसर्गजन्य आजाराबाबत प्रशासनाने दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. सर्दी, खोकल्याचे रुग्ण महापालिकेच्या दवाखान्यात आल्यास त्यांची स्वतंत्र नोंद ठेवावी. अशा रुग्णांची संख्या आणि त्यांची लक्षणे यावर बारकाईने लक्ष ठेवले जावे. सर्दी खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे का? आणि त्यांच्यात इतर कोणती लक्षणे दिसून येत आहेत का? याची तपासणी व्हावी. तसेच, शहरातील सर्दी, खोकल्याच्या रुग्णाचे सर्वेक्षण करावे.
पिंपरी चिंचवड हे औद्योगिक नगरी असल्यामुळे विविध ठिकाणाहून नागरिक सातत्याने कामानिमित्ताने ये -जा करतात. नागपूरमध्ये या आजाराचे दोन रुग्ण आढळल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शहरात कटाक्षाने खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे एकीकडे अशा रुग्णांची नोंद घेण्याबरोबरच एचएमपीव्हीबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या जाव्यात अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत. नागरिकांचे आरोग्य हे प्रथम कर्तव्य आहे. प्रशासनाकडून त्या दृष्टीने हालचाली देखील सुरू करण्यात आल्या आहेत. या शहरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्येबाबत कोणतीही गैरसोय होणार नाही याबाबत काळजी घेतली जाणार असल्याची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.