पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची धडक कारवाई; दोन व्यक्तींचे शस्त्र परवाने रद्द!

58 व्यक्तींना शस्त्र परवाने नाकारले
पिंपरी : महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील कुरुळी गावातील व चिखली पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येकी एक परवानाधारकांचे शस्त्र परवाना रद्द करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत .याशिवाय 2025 मध्ये 58 व्यक्तींना नवीन शस्त्र परवाना नाकारला आहे .

कुरुळी गावचे हद्दीत परवानाधारक मयूर गुलाब सोनवणे यांनी निष्काळजीपणाने रिव्हालवर हाताळल्याने ते स्वतः जखमी झाले होते .याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत पोलीस आयुक्तांना प्रस्ताव दिला होता .तो प्रस्ताव आयुक्तांनी मान्य करून मयूर गुलाब सोनवणे यांचा परवाना रद्द केला आहे .
चिखली पोलीस ठाणे हद्दीतील परवानाधारक प्रवीण सुरेश लुक्कर यांनी आपल्यावरील गुन्ह्याबाबत चुकीची माहिती दिल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे .लुक्कर यांच्यावर निगडी पोलीस ठाणे येथे तीन व पुणे सत्र न्यायालय येथे एक दावा दाखल आहे .याबाबत त्यांनी आपल्यावर एकच दावा असल्याचे सांगितले होते. पोलीस आयुक्त चोबे यांनी वरील प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी प्राथमिक चौकशी केली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
वर्षभरात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कक्षेतील एकूण सहा जणांचे शस्त्र परवाने पोलीस आयुक्त चौबे यांनी रद्द केले आहेत .नवीन शस्त्र परवाना प्राप्त करण्यासाठी ऑक्टोबर, नोव्हेंबर 2025 मध्ये एकूण 41 जणांनी शस्त्र परवाना साठी अर्ज केले होते .या प्रकरणी प्राथमिक चौकशी केली असता या व्यक्तींना शस्त्र परवाने मंजूर करण्यासाठी कोणताही सबळ कारण नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांचे शस्त्र परवान्याचे अर्ज फेटाळण्यात आले .2025 मध्ये पोलीस आयुक्त चौबे यांनी एकूण 58 व्यक्तींना नवीन शस्त्र परवाने नाकारले आहेत .

