अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर पोलिसांचा डोळा!

पिंपरी : आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईची शक्यता लक्षात घेऊन घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर रोखण्यासाठी पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे. घरगुती वापरासाठी असलेल्या सिलेंडर मधून व्यावसायिक सिलेंडर मध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करून त्याची चढ्या दराने विक्री होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे यांनी कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

व्यावसायिक वापरासाठी मिळणाऱ्या गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी झाल्याचे सांगितले जात आहे. सरकारने घरगुती वापराच्या गॅस पुरवठ्याला प्राधान्य दिल्याने व्यावसायिक गॅस उपलब्ध होत नाही. काही ठिकाणी व्यावसायिक कामांसाठी लागणारा गॅस मिळत नसल्याने त्याची टंचाई जाणवत आहे. याचाच गैरफायदा घेऊन काहीजण घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडर मधून व्यावसायिक सिलेंडर मध्ये गॅस भरून तो जास्त दराने विक्री करण्याचा प्रकार करीत आहेत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकारामुळे घरगुती गॅसचा पुरवठा बाधित होण्याची तसेच ग्राहकांना टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचा तसेच अवैध गॅस रिफिलिंग आढळून आल्यास कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घरगुती गॅस सिलेंडर मधून व्यावसायिक सिलेंडर मध्ये गॅस रिफिलिंग करताना कोणी आढळून आल्यास नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे .यासाठी 020- 27 35 2600, 020- 27 35 2500 , 95 29 69 1966 तसेच आपत्कालीन 112 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

