प्राधिकरणातील शेतकऱ्यांना ६.२५% जमीन परताव्याच्या सुलभतेसाठी पीएमआरडीएकडून मार्गदर्शन!

सन १९७२ ते १९८३ या कालावधीतील जमीन संपादित परतावा
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे आकुर्डीतील ग.दि. माडगुळकर सभागृहात मंगळवारी ६.२५% जमीन परताव्याबाबत संबंधित शेतकऱ्यांसोबत संवाद मेळावा घेण्यात आला. सन १९७२ ते १९८३ या कालावधीत तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने संपादित केलेल्या जमिनींच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना ६.२५% परतावा कसा, मिळणार याबाबत जमीन व मालमत्ता विभागाचे सह आयुक्त हिम्मत खराडे यांनी मार्गदर्शन केले.

संबंधित योजना शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होण्याकडे एक महत्वाचे पाऊल आहे. यावेळी ६.२५% जमीन परताव्याची कार्यपद्धती व अर्ज प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. ज्या मूळ जमीनमालक मयत आहेत, त्यांच्या वारसांनी वारस प्रमाणपत्रासह अर्ज करणे बंधनकारक आहे. १४ मार्च २०२४ या शासन निर्णयानुसार प्राधान्यक्रमाने पात्र शेतकऱ्यांना परतावा मिळावा, या उद्देशाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांच्या निर्देशानुसार संबंधित बैठक घेण्यात आली.
संबंधित १०६ शेतकऱ्यांना ६.२५% जमीन परताव्याचा लाभ व्हावा, या दृष्टिकोनातून पीएमआरडीएतर्फे वारंवार जनजागृती करण्यात येत आहे. यात आतापर्यंत १७ शेतकऱ्यांना परतावा देण्यात आला असून २ प्रकरणे पेपर नोटीसवर, १ सुनावणीसाठी तर ५ प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. यात २९ प्रकरणात संबंधितांना त्रुटीबाबत कळविण्यात आले आहे.
यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या जमीन व मालमत्ता विभागाचे सह आयुक्त हिम्मत खराडे, तहसीलदार अभिजित जगताप, विशेष भूसंपादन अधिकारी विठ्ठल उदमले, व्हिडिओ कॉन्फरद्वारे भूसंपादन समन्वय अधिकारी कल्याण पांढरे, संगीता राजापूरकर-चौगुले आदी अधिकारी उपस्थित होते. शासन निर्णयाचा लाभ घेऊन संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा परतावा मिळवून देण्यासाठी पीएमआरडीए कटीबद्ध असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अर्जदारांसाठी विशेष शिबिर
या प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना दाखले वितरित करण्यात आले असून उर्वरित अर्जदारांसाठी २५ व २६ सप्टेंबरला विशेष शिबिर घेण्यात येणार असल्याचे भूसंपादन समन्वय अधिकारी कल्याण पांढरे यांनी सांगितले. यावेळी निगडी, चिखली, मोशी, रहाटणी, रावेत, आकुर्डी आदी गावातील शेतकऱ्यांनी अर्ज करण्याची कार्यपद्धती समजून घेत त्यासाठी लागणारे कागदपत्रे, आपल्या अडचणी आणि त्यावर नियमानुसार काय उपाय आहेत यावर चर्चा करण्यात आली.
संबंधितांनी अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे
१. विहीत नमुन्यात अर्ज.
२. संपादनापुर्वी व नंतरचा ७/१२ उतारा व फेरफार
३. मुळ जमिन मालक मयत असल्यास मृत्युचा दाखला व दिवाणी कोर्टाचे वारस प्रमाणपत्र
४. विशेष भूसंपादन अधिकारी यांचेकडील भूसंपादन दाखला.
५. भूमीसंपादन कायदा १८९४ चे कलम १८,२८,३० नुसार मोबदल्यात वाढ करणेबाबत संपादनाबाबत कोणत्याही कोर्टात दावा दाखल केले नसलेबाबत व वारसाबाबत रु.१००/- स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र.
६. रु.५००/- च्या स्टँप पेपरवर केलेले क्षतीपुर्ती बंधपत्र.